हंबीरराव, प्रतापरावांचे चरित्र येणार कांदबरीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:11 AM2021-02-13T04:11:40+5:302021-02-13T04:11:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सरसेनापती म्हणून भूमिका बजावलेल्या हंबीरराव मोहिते आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सरसेनापती म्हणून भूमिका बजावलेल्या हंबीरराव मोहिते आणि प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित कादंबरी सत्तावीस वर्षीय तरुण सौरभ कर्डे लिहिले आहे.
महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कारकिर्दीत सरदार, सरसेनापती आणि मावळ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. अनेक इतिहासप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुस्तक, चरित्र, कादंबरी, नाटक, व्याख्यान, काव्य अशा वेगवेगळ्या स्वरूपात जगासमोर मांडला आहे. या इतिहासात स्वराज्याच्या सेनापतींच्याही कथा आहेत. बाजी पासलकर, नेतोजी पालकर, म्हाळोजी आणि संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यावर आधारित पुस्तके आणि चरित्रही आहेत. मात्र हंबीरराव मोहिते आणि प्रतापराव गुजर या दोन वीरांवरील स्वतंत्र लेखन फारसे नाही.
खुल्या मैदानी लढायांमध्येही शत्रूला आपण पराभूत करू शकतो, असा आत्मविश्वास शिवाजी महाराजांच्या सैन्याला देणाऱ्या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारीत मराठी साहित्यातील ‘राव’ ही पहिलीच कांदबरी असल्याचा दावा कर्डे यांनी केला. सन १६६६ ते १६७४ या आठ वर्षांच्या कारकिर्दीतील साल्हेरचा लढा, राजगडाची सुरक्षा, पुरंदरचा तह, सुरत, पन्हाळ्यावरील प्रसंग या कांदबरीतून समोर येत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही कादंबरी वाचून प्रस्तावना पाठवली आहे. प्रतावरावांचे चित्र उपलब्ध नसल्याने मुखपृष्ठासाठी काल्पनिक छायाचित्र तयार करण्यात आले आहे.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी सन १६७४ ते १६८६ या १२ वर्षांच्या कारकिर्दीतील स्वराज्याची संपत्ती वाढवण्यासाठी केलेल्या मोहिमा, राजकारणातील महत्वाची भूमिका या त्यांच्या धुरंदर कारकिर्दीचा आढावा कादंबरीतून दिसणार आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कांदबरी वाचून प्रस्तावना लिहिली आहे.
चौकट
“छत्रपती शिवाजी महाराज अनेक संकटांना तोंड देऊन पुन्हा उभे राहिले. त्यांचा आदर्श सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. त्यासाठी स्वराज्य स्थापनेत योगदान दिलेल्या सरसेनापती, सरदार आणि मावळे यांचे कर्तृत्वही तरुणांनी वाचले पाहिजे.”
-सौरभ कर्डे