Pune Crime: दहा लाखांच्या चरस प्रकरणात मुख्य सुत्रधाराला हरियाणातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:15 AM2021-10-22T10:15:46+5:302021-10-22T10:19:48+5:30
पुणे : बेकायदेशीरित्या तब्बल १० लाखांच्या चरसची तस्करी करणाऱ्या एकाला खडकी बाजार येथून पकडल्यानंतर मिळालेल्या माहितीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने ...
पुणे : बेकायदेशीरित्या तब्बल १० लाखांच्या चरसची तस्करी करणाऱ्या एकाला खडकी बाजार येथून पकडल्यानंतर मिळालेल्या माहितीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने हरियाना येथे जाऊन मुख्य सुत्रधाराला अटक केली आहे. विकास बब्बरसिंह इटकान (वय २२, रा. भारतनगर, हिंसार हरियाणा) याला खडकी बाजार येथून अटक केली होती. तर त्याचा मुख्य साथीदार भरत श्यामसुंदर भोमिक (वय ३७, रा. दयानंद कॉलनी, हिसार, हरियाणा) याला हरियाणा येथे जाऊन अटक करण्यात आली आले.
अमंली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे त्यांच्या सहकार्यांसह खडकी रेल्वे स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत असताना १७ ऑगस्ट रोजी ५ वाजण्याच्या सुमारास खडकी बाजार बसस्टँडसमोरील सार्वजनिक रस्त्यावर विकास इटकान संशयीतरित्या फिरत असल्याचे आढळून आले. त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्याच्या बॅगमधून १० लाख १० हजार ५०० रूपयांचे एक किलो चरस, मोबाईल जप्त करण्यात आले होते. गुन्ह्याचा तपास करत सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करीत असताना त्यांना चरस तस्करीतील मुख्य सुत्रधार हरियाणा येथे असल्याची माहिती पथकाला समजले. त्यानुसार पथक हरियाणा येथे रवाना करण्यात आले.
त्याप्रमाणे लक्ष्मण ढेंगळे, अमंलदर सुजित वाडेकर, संदीप जाधव, विशाल दळवी, पांडुरंग पवार, विशाल शिंदे हिसार येथे पोहचले. त्यांनी भोमिक याला १९ ऑक्टोंबर रोजी ताब्यात घेतले. त्याला पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता २५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हिमाचल प्रदेश ते खडकीपर्यंतचा चरसचा उलघडला प्रवास
मुख्य सुत्रधार भरत भोमिक हा यापूर्वी कल्याण येथे जिंदाल कंपनीत कामाला होता. त्यावेळी त्याची येथील लोकांशी ओळख झाली होती. त्यानंतर तो हरियानाला परत गेला. हिस्सार येथे त्याने कॅटिंन सुरु केले आहे. हिमाचल प्रदेशात चरसचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. भोमिक याने हिमाचल प्रदेशातून हे चरस आणले होते. त्याने ते विकास इटकान याला हिस्सारला दिले होते. विकास रेल्वेने हा चरस घेऊन आला असताना पोलिसांनी खडकीला पकडले. इटकान याने दिलेल्या माहितीवरुन पोलीस पथक या अगोदर एकदा हिस्सारला जाऊन आले होते. परंतु, तेव्हा तो मिळाला नव्हता. भोमिक याच्यावर यापूर्वी ऑर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे. मात्र, अंमली पदार्थविषयी हा पहिलाच गुन्हा असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले.