‘अलंकार’चा अधिभार कोथरूडवरच
By admin | Published: August 31, 2015 04:09 AM2015-08-31T04:09:50+5:302015-08-31T04:09:50+5:30
पुणे पोलिसांच्या वतीने कोथरूड पोलीस ठाण्याची हद्द तोडून अलंकार पोलीस ठाण्याची निर्मिती केली. परंतु अलंकार पोलिसांना स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक कर्मचारी, वाहने
कोथरूड : पुणे पोलिसांच्या वतीने कोथरूड पोलीस ठाण्याची हद्द तोडून अलंकार पोलीस ठाण्याची निर्मिती केली. परंतु अलंकार पोलिसांना स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक कर्मचारी, वाहने न दिल्याने येथील अधिभार आजही कोथरूड पोलिसांवरच येत असून, अलंकार पोलीस ठाणे फक्त नाममात्रच राहिले आहे.
त्यातच पोलीस चौकीच्या जागेतच पोलीस ठाण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याने जागेची फार मोठी समस्या व कर्मचारी संख्या कमी असल्याच्याही समस्या येत आहेत.
सुरुवातीला अलंकार पोलीस ठाण्याला राज्य शासनाची मान्यता नसल्याने भवितव्य अंधारातच होते. कालांतराने मान्यता मिळाली. मात्र जागा नसल्याने अधिकाऱ्यांना वणवण करावी लागली.
अलंकार पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी बदलीलाच प्राधान्य दिल्याने पोलीस ठाण्याची कार्यवाही लांबणीवर पडली होती. पुणे पोलीस आयुक्तांनी अलंकार पोलीस ठाण्याची कार्यवाही अलंकार चौकीच्या इमारतीतून सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर या पोलीस ठाण्याच्या कार्यवाहीला सुरुवात झाली असली तरी अपुरी व्यवस्था अन् कर्मचाऱ्यांची वानवा पोलिसांनाच सहन करावी लागत आहे.
पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था पुढे येत नसल्याने पोलिसांची लढाई अर्धवटच राहात आहे. अलंकार पोलीस ठाण्याच्या समस्येच्या गर्तेत कोथरूड भागातील गुन्हेगारी फोफावण्याची भीती लक्षात घेऊन ठोस उपाय करण्याची मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात येत आहे. (वार्ताहर)