एल्गार परिषदेत भडकावून भाषण देणाऱ्या शर्जिल उस्मानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:25+5:302021-02-05T05:00:25+5:30
पुणे : गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शनिवारी झालेल्या एल्गार परिषदेत भडकावून भाषण देणाऱ्या शर्जिल उस्मानी यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी ...
पुणे : गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शनिवारी झालेल्या एल्गार परिषदेत भडकावून भाषण देणाऱ्या शर्जिल उस्मानी यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
याप्रकरणी भारतीय युवा जनता मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप हरीभाऊ गावडे यांनी फिर्याद दिली आहे.
एल्गार परिषदेचे शनिवारी ३० जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला केवळ २०० जणांना परवानगी देण्यात आली होती. पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, परिषदेत एकूण ६ सत्रे होती. त्यामध्ये कबीर कला मंच व समता मंच यांचा शाहिरी जलसा, काव्य वाचन, पत्र वाचन आयोजित केले होते. तसेच मान्यवरांची भाषणे होती. सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी शर्जिल उस्मानी याचे भाषण होते. भाषण करीत असताना त्यांनी आपल्या भाषणात भारतीय संघ राज्य विरोधात व हिंदू विरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावू विधाने केली. आपल्या भाषणात त्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केले होते. त्या विधानाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. उस्मानी यांनी भारतीय न्यायव्यवस्था कायदे मंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अवमान करत माझा भारतीय संघराज्यावर विश्वास नाही, असे विधान केले आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.
प्रदीप गावडे यांच्या फिर्यादीनुसार स्वारगेट पोलिसांनी भा. दं. वि. १५३ (अ) नुसार शर्जिल उस्मानी (रा. अलीगढ विद्यापीठ, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.