अनैतिक संबंधाच्या आरोपातून तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 02:18 AM2019-01-28T02:18:18+5:302019-01-28T02:18:41+5:30
अनैतिक संबंधाचा संशय घेऊन त्याची गावभर बोंबाबोंब करून पत्नीला मारहाण करणाऱ्या समजावून सांगण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला.
पुणे : अनैतिक संबंधाचा संशय घेऊन त्याची गावभर बोंबाबोंब करून पत्नीला मारहाण करणाऱ्या समजावून सांगण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला. ८ महिन्यांपूर्वी घडलेल्या हा खुनाचा प्रकार ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. त्यांनी त्याच्या मावस भावास अटक केली आहे.
दीपक अशोक गोरडे (वय २३, रा. लोंढेमळा, एकलहरे, कळंब, ता. आंबेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत विकास किसन खंडागळे (वय ३०, रा़ मांजरवाडी, खंडागळेमळा, ता़ जुन्नर) याचा ११ एप्रिल २०१८ रोजी खून झाला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, विकास खंडागळे याचा दुसरा विवाह झाला होता. तो वरातीत बेंजो वाजवायचा. त्याला दारूचे व्यसन होते. तो आपल्या पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय घेत असे. त्याची गावभर चर्चा करून बदनामी करत. त्यावरून तो पत्नी व आईला वारंवार मारहाण करीत असत. त्याची पत्नी बाजारासाठी मंचरला आल्यावर कधी तरी त्यांच्या घरी जात असे. तसेच ती आजारी असताना दीपक गोरडे यांनी तिला मोटारसायकलवरून दवाखान्यात नेले होते. यावरून तो त्यांची बदनामी करीत होता. तसेच त्याच्या मित्राची बदनामी करीत होता. दीपक गोरडे यांनी त्याला वारंवार समजावून सांगितले होते. तरीही तो ऐकत नव्हता.
११ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळपासून तो त्याच्या पत्नीला मारहाण करीत होता. तिने फोन करून ही बाब दीपक याला सांगितले. तेव्हा तो त्यांच्या घरी आला. त्याला समजावून सांगण्यासाठी त्याला घेऊन बाहेर नेले. तेथे तो शिवीगाळ करू लागल्याने त्याने विकास याला पट्ट्याने व लाकडी काठीने मित्राच्या मदतीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. तेव्हा त्याला त्यांनी पुन्हा घरी आणून सोडले. व त्याची मोटारसायकल तेथे ठेवून ते निघून गेले होते. ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक रवींद्र मांजरे, हवालदार दत्तात्रय जगताप, शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, सी़ बी़ बागेवाडी, दीपक साबळे, अक्षय जावळे यांनी ही कामगिरी केली.