शुल्कवाढीला बसणार चाप
By admin | Published: December 10, 2015 01:37 AM2015-12-10T01:37:39+5:302015-12-10T01:37:39+5:30
मागील काही वर्षापासून सतत वाढणाऱ्या अवाजवी शुल्क वाढीविरुद्ध विविध पालक संघटनेने छेडलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे.
पुणे : मागील काही वर्षापासून सतत वाढणाऱ्या अवाजवी शुल्क वाढीविरुद्ध विविध पालक संघटनेने छेडलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. कॅपिटेशन फी अॅक्टनुसार, शाळांनी तीन वर्षांतून एकदाच शुल्क आकारावे, असा आदेश पुणे विभागीय उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांना दरवर्षीच्या शुल्कवाढीच्या चक्रातून दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी अवाजवी शुल्कवाढ केली जात आहे. याविरोधात विविध पालक संघटनांनी आवाज उठवला, आंदोलने केली आहेत. पालकांची संघटना असणाऱ्या पॉपसॉम या संघटनेने गेल्या काही दिवसांपासून शिक्षण उपसंचालक जाधव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यानुसार बुधवारी दुपारी ४ वाजता पॉपसॉमच्या अध्यक्षा अनुभा सहाय व मीरा दिलीप यांच्यासमवेत जाधव यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी कॅपिटेशन फी १९८८ अॅक्टनुसार प्रत्येक शाळेने दरवर्षी शुल्कवाढ करू नये, तसेच ती तीन वर्षांतून एकदाच करावी, असा नियम आहे. याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये शाळांनी तीन वर्षांतून एकदाच शुल्कवाढ करावी, असा आदेश शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिले.
जाधव म्हणाले, ‘‘ज्या शाळांनी त्या त्या वेळी अस्तित्वात आलेल्या शुल्क कायद्याप्रमाणे गत तीन वर्षांत शुल्क घेतलेली नसेल तर ती अवैध ठरणार आहे. संबंधित शाळांनी नियमानुसारच फी घ्यावी. शाळेने सुरुवातीला एका महिन्याच्या ट्युशन शुल्कइतकीच प्रवेश शुल्क आकारावे. शाळास्तरावर पालकांना गणवेश, बूट, जेवण व इतर साहित्य शाळेतून घेण्याबाबत सक्ती करू नये. तसेच सातत्याने दरवर्षी बेकायदेशीर शुल्कवाढ केली असेल तर असे शुल्क पालकांना परत करावे.’’
तसेच फी रेग्युलेशन अॅक्ट २०११ नुसार समित्या अस्तित्वात येणार आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून यासंदर्भातील तक्रारी समित्यांमार्फत सोडविल्या जातील, असेही जाधव यांनी
सांगितले आहे.
(प्रतिनिधी)