शुल्कवाढ : शांतता, कारवाई सुरू आहे...
By admin | Published: April 26, 2017 03:02 AM2017-04-26T03:02:38+5:302017-04-26T03:02:38+5:30
शुल्कवाढीविरोधात पालकांचा आक्रोश वाढत असला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून केवळ कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे : शुल्कवाढीविरोधात पालकांचा आक्रोश वाढत असला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून केवळ कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शुल्कवाढ करणाऱ्या शाळांना नोटिसा पाठविल्या जात असल्या तरी अद्याप एकाही शाळेवर शुल्क नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई झालेली नाही. त्यामुळे पालकांना सध्या ‘शांतता, कारवाई सुरू आहे,’ असा अनुभव येत आहे.
शुल्क नियंत्रण कायद्यानुसार शाळांना दोन वर्षांतून एकदा १५ टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ करता येवू शकते. मात्र, त्यासाठी शाळेतील पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक शाळांनी या समितीला टाळून येत्या शैक्षणिक वर्षासाठी अवाजवी शुल्कवाढ केली आहे. काही शाळांनी तर मागील वर्षी प्रमाणेच यंदाही शुल्कवाढ करून पालकांवर आर्थिक बोजा टाकला आहे. याबाबत पालक संघटना तसेच वैयक्तिक पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासह शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही शाळेवर कायद्यानुसार कारवाई झालेली नाही. त्यामुळे सोमवारी ‘पॉपसम’ या पालक संघटनेच्या नेतृत्वाखाली १८ ते २० शाळांतील पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन केले. उपसंचालक दिनकर टेमकर यांच्या कार्यालयात ठिय्या मारून घेराव घातला. मात्र त्यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने पालकांना पोलीस ठाणे गाठावे लागले.
बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये पालक संघटनेच्या प्रतिनिधींसह टेमकर, सहायक संचालिका मीनाक्षी राऊत, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांच्या अन्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी संतप्त पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या वेळी टेमकर यांनी संबंधित शाळांवर कारवाईचे काम सुरू असून आवश्यकतेनुसार नोटीस दिल्या जात आहेत, असे त्यांना सांगितले. शाळांकडून कायद्याचे उल्लंघन होत असतानाही कायदेशीर कारवाई का केली जात नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला. त्यावर टेमकर यांनी याबाबत विधी विभागाचा सल्ला घेऊन पंधरा दिवसांत पुढील कारवाई करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे ‘पॉपसम’च्या अनुभा सहाय यांनी सांगितले.