मळवलीतील रामगुडे सहनिवास गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षावर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:08 AM2018-12-21T01:08:06+5:302018-12-21T01:08:18+5:30
जामीन मंजूर : संस्था सभासदांची फसवणूक केल्याचे फेर लेखापरीक्षणात निष्पन्न
लोणावळा : सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदांच्या हितास बांधा पोहोचवत संस्थेची जागा स्वत:च्या व पत्नीच्या नावे करणे, संस्थेतील मोकळी व सुखसोयींची जागा परस्पर विकणे, भूखंडाची बेकायदा विक्री करणे, असे अनेक प्रकार करत सभासदांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाटण मळवली (ता. मावळ) येथील रामगुडे सहनिवास क्रमांक २ सहकारी गृहरचना संस्था मर्यादितचे अध्यक्ष महेश
तुकाराम रामगुडे (रा. बोरीवली पूर्व, मुंबई) यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेश सुदाम भुजबळ यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
रामगुडे गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आनंद आळशी व इतर १८ जणांनी रामगुडे गृहनिर्माण संस्थेचे सन २०११ ते २०१६ या कालावधीमधील फेर लेखापरीक्षण करण्याची मागणी पुणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ३० एप्रिल २०१७ रोजी केला होता. यानुसार व जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशान्वे लेखापरीक्षक भुजबळ यांनी संस्थेचे फेर लेखापरीक्षण केले असता रामगुडे यांनी महाराष्ट्र सह संस्था अधिनियम १९६० व ६१ च्या कलम ४, १२ व १० अन्वेय तरतुदीचे पालन न करता संस्थेची नोंद करत सभासदांच्या हिताला बाधा आणत त्यांची फसवणूक केली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर १८ आॅगस्ट २०१८ रोजी लेखापरीक्षक भुजबळ यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात महेश रामगुडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
फिर्यादीमध्ये भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्था नोंदणी प्रस्तावामध्ये नमूद केलेली जमीन धारणा क्षेत्र हे १ लाख ७३ हजार ७२४.४ चौरस मीटर असून, त्यापैकी १७ हजार २६४.७९ चौरस मीटर क्षेत्र हे सुखसोयीकरिता राखीव आहे. या राखीव क्षेत्रापैकी ४ हजार ३०२.९९० चौरस मीटर क्षेत्र रामगुडे यांनी जिल्हाधिकारी तसेच मावळ तहसीलदार यांची परवानगी न घेता १० जणांना बेकायदा विकत त्यांची फसवणूक केली आहे. तर १२ हजार २०७.१४ चौरस मीटर मोकळ्या जागेपैकी ५०१.४५५ चौरस मीटर जागेची तीन सदस्यांनी विक्री केली.
संस्थेच्या आवारातील मोकळी जागा व सुखसोयीची जागा ही संस्थेच्या म्हणजेच सर्व सभासदांच्या मालकीची असताना संस्था अध्यक्ष रामगुडे यांनी या जागा स्वत:च्या नावे ठेवून सभासदांची फसवणूक केली. रहिवासी क्षेत्र असलेल्या जागेवर अनेक प्लॉट चुकीच्या पद्धतीने करत त्यांची बेकायदा विक्री केली तर काही स्वत:च्या नावावर ठेवले. यामुळे अकृषक आदेशाचे उल्लंघन व संस्था सभासदांची आर्थिक फसवणूक झाली असल्याचा ठपका महेश रामगुडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तो तपासाकरिता पुणे ग्रामीणच्या विशेष आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी दिली. याप्रकरणी रामगुडे यांना जामीन मंजूर झाला असून, दर रविवारी हजेरीकरिता पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.