वाटलूज येथील चार वाळू तस्करांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:33+5:302021-05-13T04:10:33+5:30
राजेगाव : वाटलूज (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात बेकायदेशी वाळूउपसा करून चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल ...
राजेगाव : वाटलूज (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात बेकायदेशी वाळूउपसा करून चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला. त्यातील दोघांना ताब्यात घेतले. चोरांकडून ६६ लाख ९९ हजार रुपयांची चोरीची वाळूही जप्त करण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाटलूजजवळ गेल्या अनेक दिवसांपासून वाळूचोर बिनदिक्कतपणे वाळूचोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी कळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. त्यावेळी यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने तेथे वाळूचोरी सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तेथील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या इतर दोन साथीदारांवरही गुन्हा दाखल केला.
याबबात पोलीस अमलदार किरण ढुके यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परिमंडळ पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ, पोलीस अमलदार किरण ढुके, विशाल जावळे, गणेश कडाळे, सागर गायकवाड यांनी केली.
--
सूत्रधारांवर कारवाई कधी?
वाटलूज येथे गेली अनेक वर्षे सर्रास वाळूचोरी होत आहे. या काळ्या सोन्याच्या विक्रीतून काही ठरावीक लोकांनी अमाप माया जमा केली आहे. त्यामुळे ज्या दोन अज्ञात वाळू तस्करांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ते धेंड कोण आहेत याची नावे अद्याप पोलिसांनी उघड केली नाहीत. वास्तविक येथे चोरीचा धंदा कोण करत आहेत, त्यांची नावे सिक्रेट आहेत. तरी त्यांची नावे फिर्यादीमध्ये व गुन्ह्यामध्ये स्पष्टपणे का आली नाही, याची ‘अर्थपूर्ण’ चर्चा रंगली आहे.