आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 02:06 PM2022-02-26T14:06:27+5:302022-02-26T14:18:18+5:30
सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत...
पुणे : बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत.
याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पाडे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय होतं प्रकरण-
महाराष्ट्र विधीमंडळाच्या २०२१ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नानुसार शासनाने सन २०१५ ते २०१९ या पाच वर्षीय कालावधीतील संपूर्ण फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी करण्याकरीता तात्कालिक पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षेतेखाली त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती.
सदर उच्चस्तीय समितीने सन २०१५ ते २०१९ या पाच वर्षाचे कालावधीतील फोन टॅपिंग प्रकरणांची पडताळणी करुन उपरोक्त कालावधीमध्ये अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपध्दतीने टॅप करण्यात आले आहेत किंवा कसे? याचा तपास करणे व तसे आढळल्यास अशा प्रकरणी संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल शासनाने स्विकृत केला.
सदर उच्चस्तरीय समितीने श्रीमती. रश्मी शुक्ला, तत्कालीन पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी त्यांचे कार्यकाळात बेकायदेशीर अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केले असे नमुद केल्याने रश्मी शुक्ला, तत्कालीन पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेवर आणि इतर संबंधित यांच्यावरती भारतीय तार अधिनियम कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.