लाचेची मागणी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:10 AM2020-12-09T04:10:20+5:302020-12-09T04:10:20+5:30
पुणे : जमीन मोजणीसाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भूकरमापक व शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल ...
पुणे : जमीन मोजणीसाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भूकरमापक व शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भूकरमापक रवींद्र नारायण शेळके (वय २९) आणि शिपाई दीपक शिवराम ताजणे (वय ४०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही शिरुर तालुक्यातील भूमि अभिलेखा विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात नेमणूकीला आहेत.
तक्रारदार यांनी जमीन मोजणीसाठी आवश्यक ती शासकीय फी भरलेली होती. तक्रारदार यांच्या जमिनीची मोजणी करुन देण्यासाठी शेळके यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून १९ ऑगस्टमध्ये याची पडताळणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात लाच देण्यात आली नव्हती. तरीही लाचेची मागणी झाली असल्याने शिरुर पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी अधिक तपास करीत आहेत.