सीबीआयकडून एनडीएच्या प्राचार्य विरोधात दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:12 AM2020-12-24T04:12:40+5:302020-12-24T04:12:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबाीआय) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्राचार्या विरोधात मंगळवारी सीबीआयच्या विशेष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबाीआय) राष्ट्रीय संरक्षण
प्रबोधिनीच्या (एनडीए) प्राचार्या विरोधात मंगळवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. एनडीएमध्ये शिक्षक नेमणुकीसाठी बनावट कागदपत्रे सादर करून नेमणूक करून घेतल्याच्या आरोपावरून प्राचार्यासह पाच प्राध्यापकांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबाआय) ८ मे २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता.एनडीए’चे तत्कालीन अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांनी स्वतःच्या कामाबाबत अनुभवाची बनावट कागदपत्रे यूपीएससीला सादर करून चुकीच्या पद्धतीने प्राचार्य पद मिळवले असा ठपका सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे. तर, इतर प्राध्यापकांनी ‘शैक्षणिक प्रगती गुणांक अहवाल’मध्ये अनुभव वाढवून दाखवल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.
‘एनडीए’चे प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख जगमोहन मेहेर, रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक वनिता पुरी, रसायनशास्त्र विभाग प्रमुख माहेश्वर रॉय आणि गणित विभागातील सहायक प्राध्यापक राजीव बन्सल या पाच जणां विरोधात गुन्हा दाखल केला होता.
एनडीएमध्ये शिक्षकांची नेमणूक ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) केली जाते. एनडीएमध्ये २००७ते २०१३ दरम्यान शिक्षकांच्या नेमणुका झाल्या होत्या. एनडीएमध्ये प्राध्यापक म्हणून नेमणूक होण्यासाठी
अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणवत्ता दाखला, शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक (एपीआय) अशी वेगवेगळी प्रमाणपत्रे लागतात.यापैकी काही प्रमाणपत्र या शिक्षकांनी बनावट तयार केली. ती सादर करून २०११ मध्ये एनडीएमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीवर रुजू झाले. यूपीएससीला बनावट कागदपत्रे देवून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत सीबीआयने वेळोवेळी कागदोपत्री पुरावे गोळा करून सादर केले आहेत.
शुक्ला हे २०११ पासून प्राचार्य पदावर काम करत आहेत. इतर आरोपी हे सहायक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. अशा प्रकारची खोटी कागदपत्रे सादर करुन संरक्षण मंत्रालयाची फसवणूक केली आहे. सीबाआयने केलेल्या तपासावरुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे.
प्राचार्यांशिवाय, अन्य चौघांविरूध्द संस्था पातळीवर चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.