Mhada Paper Leak: म्हाडा पेपरफुटी प्रकरणी तीन जणांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 05:38 PM2022-03-11T17:38:20+5:302022-03-11T17:38:30+5:30
म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सायबर पोलिसांनी तीन आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले
पुणे : म्हाडापरीक्षा पेपरफुटी प्रकरणात सायबर पोलिसांनी तीन आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र २ हजार २०० पानांचे असून, तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या साधनांमधून आरोपींविरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे सायबर पोलीसांनी संपूर्ण तपासानंतर डॉ. प्रितिश देशमुख एजंट अंकुश हरकळ , संतोष हरकळ या तिघां विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडााधिकारी श्रध्दा डोलारे यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल केले. म्हाडा पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत एकूण सहाजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये देशमुख आणि हरकळ बंधू यांच्यासह जमाल इब्राहीम पठाण (वय-४७,रा.जळकोट,लातूर), कलीम गुलशेर खान (५२,रा.बुलढाणा), दीपक विक्रम भुसारी (३२,रा.बुलढाणा) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र तीन जणांविरूद्धच हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, आर्थिक व सायबर गुन्हे पोलिस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजय पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके व पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांनी हा तपास केला.
आरोग्य भरती, पोलीस भरती आणि एमपीएससी परीक्षांमधील घोटाळ्यानंतर म्हाडा अंतर्गत घेण्यात येणा-या अ,ब,क पदांच्या परीक्षांचा पेपर फुटीचा प्रयत्न झाल्याने राज्यात एकच खळ्बळ उडाली. म्हाडाच्या परीक्षांच्या नियोजनांचे कामही जी.ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि कंपनीलाच देण्यात आले होते. म्हाडा पेपर फुटी प्रकरणाच्या रँकेटची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांची पथके औरंगाबाद, बीड, जालना, पुणे, ठाणे येथे पाठविण्यात आली होती. पोलिसांचे पथक हे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या संशयित हालचालींवर लक्ष ठेवून होते. हे दोघे पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख यांना भेटणार होते. तिथेच देशमुख हा पेनड्रायव्हमध्ये पेपर घेऊन दोघांना देणार होता. त्यांच्याकडे पेनड्रायव्हरमध्ये पेपर सापडले. दोघांना परीक्षार्थींचे पेपरसाठी फोन येत होते. या सर्वगोष्टींचे पुराव्याच्या आधारावर या पेपरफुटी प्रकरणात तिघांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तिघांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.