सावधान! सार्वजनिक चार्जिंग पॉईंटवर मोबाइल चार्ज करताय; बॅंक खाते रिकामे होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 09:52 AM2022-11-16T09:52:46+5:302022-11-16T09:52:55+5:30

तुमचा मोबाइल सहजपणे हॅक होऊन तुम्ही ‘ज्यूस जॅकिंग’चे शिकार ठरू शकता

Charging mobiles at public charging points Chances of emptying the bank account | सावधान! सार्वजनिक चार्जिंग पॉईंटवर मोबाइल चार्ज करताय; बॅंक खाते रिकामे होण्याची शक्यता

सावधान! सार्वजनिक चार्जिंग पॉईंटवर मोबाइल चार्ज करताय; बॅंक खाते रिकामे होण्याची शक्यता

googlenewsNext

नम्रता फडणीस

पुणे: मोबाइल डिस्चार्ज हाेताेय...अवघ्या अर्ध्या तासात रेल्वे प्लॅटफॉर्मवर येणार आहे. अशा वेळी शक्य तेवढा माेबाइल चार्ज करण्याच्या उद्देशाने पटकन स्टेशनवरील चार्जिंग पॉईंटवर मोबाइल चार्ज करायला लावत असाल तर... सावधान ! तुमचे बॅंक खाते रिकामे हाेण्याबराेबरच गुप्त माहिती चाेरीला जाऊ शकते. सार्वजनिक चार्जिंग स्टेशन ठरू शकताे आर्थिक फसवणुकीचा सापळा. याचा प्रत्येय अनेकांना येत आहे.

घाईघाईत तिथल्याच पोर्टवर कुणीतरी डेटा केबल विसरला असेल म्हणून, त्या डेटा केबलद्वारे आपला मोबाइल चार्ज करायला लावाल तर तुम्ही फसू शकता. तुमचा मोबाइल सहजपणे हॅक होऊन तुम्ही ‘ज्यूस जॅकिंग’चे शिकार ठरू शकता, असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.

तज्ज्ञ तरुण सांगताेय...

- लेबर लॉ ॲडव्हायझर असलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात तो सांगत आहे की, बऱ्याचदा रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट किंवा कॅफेमध्ये मोबाइल चार्जिंग स्टेशन पाहिले असाल. तेथे आपण मोबाइल चार्ज करतो, पण ताे चार्जिंग स्टेशन सापळा ठरून तुमचे बॅंक खाते रिकामे हाेऊ शकते.
- ज्या पोर्टवरून आपण मोबाइल चार्ज करतोय तिथून तुमच्या मोबाइलचा डेटा ट्रान्सफर होऊ शकतो. काही सायबर चोरटे स्टेशनवर एक यूएसबी पोर्ट लावतात. त्यात एक चीप लावलेली असते किंवा आपली डेटा केबल तिथे जाणीवपूर्वक सोडून जातात. त्यात बसविलेल्या चीपद्वारे एक मालवेअर तुमच्या मोबाइलमध्ये सोडला जातो. जो तुमच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडिओ किंवा बँकेची माहिती हँकर्सपर्यंत पोहोचवितो. तिथून मग संबंधित व्यक्तीला ब्लँकमेल करून जाळ्यात ओढले जाते.
- ‘ज्यूस जॅकिंग’ प्रकारातून हैदराबादमधील एका उच्चभ्रू व्यक्तीच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी १६ लाख रुपयांना लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकाराला सायबर तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे.

‘ज्यूस जॅकिंग’ म्हणजे काय?

कनेक्टेड डिव्हाइसशी कॉम्प्रमाइज करण्यासाठी संक्रमित यूएसबी चार्जिंग स्टेशनचा वापर करून केलेला सायबर फसवणुकीचा ‘ज्यूस जॅकिंग’ हा एक प्रकार आहे. चार्जिंग केबलद्वारे मोबाइल हॅक केला जातो. सायबर चोरटे सार्वजनिक चार्जिंग पोर्टचा वापर करून तेथे जोडलेल्या ग्राहकाच्या फोनमध्ये मालवेअर ट्रान्स्फर करतात आणि ग्राहकांच्या मोबाइल फोनमधून (‘ज्यूस जॅकिंग) ई-मेल, एसएमएस, सेव्ह पासवर्ड इत्यादी डेटा सेन्सिटीव्ह डेटा कंट्रोल / ॲक्सेस / चोरी करतात.

''रेल्वे स्टेशनवर मोबाइल चार्ज करताना एक नोटिफिकेशन विचारले जाते, त्यात चार्जिंग किंवा फाइल ट्रान्सफर असा पर्याय येतो. त्यासाठी आधी अलाऊ (हो किंवा नाही) असे विचारले जाते. बहुतांश वेळा काहीही न वाचताच अलाऊ म्हटले जाते. त्यामुळे तुमचा मोबाइल हॅक होण्याची शक्यता वाढते. अलाऊ न म्हणताही तुमचा मोबाइल सहजपणे चार्ज होऊ शकतो. याची अनेकांना कल्पनाच नसते. - ॲड. आशिष पाटणकर व प्रतीक राजोपाध्याय, सायबर तज्ज्ञ, वकील''

''सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हॅकर्स फसवणुकीसाठी विविध टुल्सचा वापर करत आहेत. आजकाल एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनवर मोबाइल चार्जिंग स्टेशन्सचा वापर करून 'ज्यूस जॅकिंग'चा प्रकार करत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे आपण बहुतांशवेळा चार्जिंग स्टेशनच्या यूएसबी केबल्स कुठे कनेक्ट केल्या आहेत ते न पाहताच माेबाइल चार्जिंगला लावताे. त्यातून मोबाइलमध्ये आलेला मालवेअर लक्षात येत नाही. त्याद्वारे तुमच्या मोबाइलमधील पर्सनल डेटा हॅक होऊ शकतो. - रोहन न्यायाधीश, सायबर तज्ज्ञ'' 

काय काळजी घ्याल?

- सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करताना तो यूएसबी कुठे कनेक्ट केला आहे, ते पाहिले पाहिजे. शक्यताे आपला मोबाइल चार्जिंगसाठी अशा ठिकाणी लावूच नये.
- डिव्हाइस मॅनेजरमध्ये कोणत्या गोष्टींंना परवानगी दिली आहे, ते बघायला पाहिजे. डेव्हलपर मोड ऑन असेल तर आपला मोबाइल अशा कुठल्याही यूएसबीला कनेक्ट झाल्यास आपला वैयक्तिक डेटा हॅकर्सकडे जाऊ शकतो.
- प्रवासाला निघत असाल तर आपला मोबाइल चार्ज करण्यास किंवा दुसरे पोर्टेबल डिव्हाइस घेऊन जाण्यास विसरू नका, जेणेकरून आपल्या फोनची बॅटरी संपली तर विमानतळ किंवा रेल्वेस्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी ते पुन्हा चार्ज करण्याची आवश्यकता नाही.
- सार्वजनिक / अज्ञात चार्जिंग पोर्ट / केबल्स वापरणे टाळा.

फ्री वाय-फाय नेटवर्कही धाेकादायक

हॉटेल किंवा सार्वजनिक ठिकाणी फ्री वायफाय सुविधा मिळत आहे. म्हणून अनेक जण त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. हा सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरत असाल तर ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरू शकता. वायफायच्या माध्यमातून ॲटोमॅटिक तुमचा डिव्हाइस संबंधित हॅकर्सच्या संपर्कात येतो आणि तुमचा फोन हॅक होऊ शकतो.

Web Title: Charging mobiles at public charging points Chances of emptying the bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.