कोरोनामुळे छत्र हरपलेल्या मुलांचे धर्मादाय आयुक्तालय करणार पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:28+5:302021-05-22T04:11:28+5:30
पुणे : कोरोनामुळे छत्र हरपलेल्या मुलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तालयाने घेतला आहे. ज्या कुटुंबातील आई आणि वडील अशा ...
पुणे : कोरोनामुळे छत्र हरपलेल्या मुलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तालयाने घेतला आहे. ज्या कुटुंबातील आई आणि वडील अशा दोघांचे कोरोना महामारीने निधन झाले आहे, अशा पाल्यांचे संपूर्ण पुनर्वसन करणार असल्याचे धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी सांगितले.
पुणे, सोलापूर, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे एकाच कुटुंबातील पती-पत्नी यांच्या निधनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांच्या कुटुंबातील पाल्य हे छत्र हरपल्यामुळे अशा महामारीच्या परिस्थितीत एकाकी पडले आहेत. या पीडित मुलांचे पुनर्वसन राज्यातील धर्मादाय संस्थांच्या मार्फत करण्यात येणार आहे.
पुणे, सोलापूर, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यातील ज्या मुलांचे आई-वडील कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे, अशा निराधार मुलांनी स्वतः अथवा नातेवाईकांमार्फत पुणे धर्मादाय आयुक्तालय, ढोले पाटील रस्ता येथे संपर्क साधावा, असे आवाहन सुधीरकुमार बुक्के यांनी केले आहे.
---
छत्र हरपलेल्या अशा पाल्यांचा संपूर्ण शिक्षणाचा, राहण्याचा, जेवणाचा खर्च धर्मादाय संस्थांमार्फत करण्यात येणार आहे. जोपर्यंत तो पाल्य स्वतःच्या पायावर उभा राहत नाही. तोपर्यंत सर्व जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत.
- नवनाथ जगताप, उपायुक्त, धर्मादाय, पुणे