भगवा व आरक्त डाळिंबांची परदेशाला मोहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:04 AM2021-02-19T04:04:54+5:302021-02-19T04:04:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबांना केंद्र सरकारचे भौगोलिक मानांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन) मिळाल्याने राज्य सरकारकडून त्याचा ब्रँड तयार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबांना केंद्र सरकारचे भौगोलिक मानांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन) मिळाल्याने राज्य सरकारकडून त्याचा ब्रँड तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. द्राक्षनिर्यातीत यश मिळाल्यानंतर आता डाळिंब निर्यात वाढवण्याकडे लक्ष दिले जात असून, त्यासाठी उत्पादकांचे मेळावे घेत डाळिंबांच्या बागांची नोंदणी करण्यात येत आहे.
आतापर्यंत ८०० डाळिंब बागांची नोंदणी झाली असून, आणखी दीड हजार उत्पादकांनी त्यांच्या बागांची नोंदणी करण्यासाठी अर्ज नेले आहेत. भगवा व आरक्त या दोन वाणांना परदेशात सर्वाधिक मागणी असल्याने त्याचीच जास्त प्रमाणात लागवड होते. राज्य निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले की, राज्यातून शेतमालाची सर्वाधिक निर्यात व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. मागणी केलेल्या देशातील सर्व निकष उत्पादकाला पाळावे लागतात. त्यासाठीच बागांची नोंदणी करून घेण्यात येत आहे.
सोलापूरशिवाय सांगली, नाशिक, अहमदनगर, पुणे, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये डाळिंब पिकवले जाते. लागवड केल्यापासून दोन वर्षांनी उत्पादन घेतले जाते. हेक्टरी १० ते १२ मेट्रिक टन उत्पादन मिळते. देशात डाळिंबाचे क्षेत्र १ लाख ८० हजार हेक्टर आहे. त्यातले १ लाख २८ हजार क्षेत्र महाराष्ट्रात आहे. त्यातलेही ७० टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात व त्यामधील ५० टक्के सांगोला तालुक्यात आहे. सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबालाच केंद्र सरकारचे जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे राज्य कृषी विभागाने या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
चौकट
डाळिंबात राज्य अव्वल
“पणन मंडळाच्या वतीने राज्यात ४५ ठिकाणी निर्यात सुविधा केंद्र सुरू आहे. डाळिंब उत्पादकांना निर्यातीसाठी या ठिकाणी मार्गदर्शन केले जाते. येत्या काळात द्राक्षांप्रमाणेच डाळिंब निर्यातीतही महाराष्ट्र पहिल्या क्रमाकांचे राज्य असणार आहे.”
-सुनील पवार, संचालक, पणन मंडळ