चासकमान धरण ९२ टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 05:26 PM2023-07-28T17:26:22+5:302023-07-28T17:26:55+5:30
काठालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन चासकमान प्रकल्प प्रशासनाने केले आहे....
राजगुरुनगर (पुणे) : खेड आणि शिरूर तालुक्याला वरदान ठरलेले चासकमान धरण शुक्रवारी (दि. २८) दुपारी ४ वाजता ९२ टक्के भरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. चासकमान धरण जलाशयाची पाणी पातळी ६४८.६४ मी आणि साठा (१९८.७०५ दलघमी ९२.६४%) झाला असून चासकमान प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण आणि पाणी साठ्यात होणारी निरंतर वाढ लक्षात घेता काही तासात धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या आठवड्यात धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यात देखील गेल्या दोन तीन दिवसांत पाऊस वाढला आहे. यामुळे दिवसाला साधारणपणे ७ ते ८ टक्के पाणीसाठा होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार दि २५ रोजी सकाळी ९ वाजता धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ४०० क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे. याद्वारे येथील वीज केंद्र कार्यान्वित झाले आहे. कालव्यात पाणी सोडल्याने खेड, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या पाण्याचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले आहे.
सध्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा सुरु आहे. पुढील काही तासात धरणातील पाणीसाठा ९३ टक्के पाणी होऊ शकतो. त्यानंतर पाणी वाढल्यास सांडव्यावरून भीमा नदीत विसर्ग सोडण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाकडू सांगण्यात आले. धरणाचे दरवाजे उघडले तर भीमा नदीला पूर येणार आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. काठालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन चासकमान प्रकल्प प्रशासनाने केले आहे.