चासकमान धरण ९० टक्के भरले, भीमा नदीत पात्रात ४ हजार २९५ क्यूसेक्स विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:14 AM2022-07-16T11:14:42+5:302022-07-16T11:17:00+5:30
भीमा नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा....
राजगुरुनगर:पुणे जिल्हातील महत्वाच्या चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे आज (दि १६ ) सकाळी साडेदहा वाजता धरण ९० टक्के भरले. धरणाचे सांडव्यामार्गे ४ हजार २९५ क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीला करण्यात आला आहे. प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील कळमोडी, चासकमान, भामा आसखेड या तीन धरणांपैकी कळमोडी धरण ११ जुलै रोजी १०० टक्के भरले, तर भामा आसखेड धरण ७८ टक्के भरले आहे. चासकमान धरण मागील वर्षी ५ ऑगस्टला पूर्ण भरले होते. गेल्या काही दिवसांपासून दिवसांपासून चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भीमाशंकर, भोरगिरी, कारकुडी, मंदोशी, कुडे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चासकमान धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढला आहे.
धरण क्षेत्रात ५१७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. यामुळे भीमानदीकडेच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात प्रवेश करू नये. शेतकऱ्यांनी नदीतील कृषी पंप काढून घ्यावेत,असे आवाहन चासकमान पाटबंधारे प्रशासनाने केले आहे. धरण भरल्याने खेड, शिरूर तालुक्यांमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.