खेड तालुक्यातील चासकमान धरण ‘ओव्हरफ्लो ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 07:22 PM2018-07-21T19:22:48+5:302018-07-21T19:26:02+5:30
चासकमान धरण ९६.९० टक्के म्हणजेच ८.३० टिएमसी भरले असून खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून धरणाचे पाचही दरवाजे चार वाजता उघडून सांडव्याद्वारे ५२७५ क्युसेक्स वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
चासकमान:- खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगावर सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे चासकमान धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे ८.७५ टिएमसी क्षमता असलेले चासकमान धरण ९६.९० टक्के म्हणजेच ८.३० टिएमसी भरले असून खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून चासकमान धरणाचे पाचही दरवाजे चार वाजता उघडून सांडव्याद्वारे ५२७५ क्युसेक्स वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाची सरासरी एकूण ४३६ मिलिमीटर इतकी आहे. धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ५७५ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला असून तासाला १.८ मेगाव्हॅट वीज निर्मिती सूरू झाली आहे. कळमोडी धरणाच्या आठही दरवाजाद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग बाहेर पडत असल्याने भिमनेर खोऱ्यातील मंदोशी,डेहेणे,वाडा,खरोशी,कहू,कोयाळी, यासर्व ठिकाणचे पाणी चासकमान धरणाला मिळत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊन ते ९६.९० टक्के भरले आहे. सध्या धरणात ९६.९० टक्के पाणीसाठा झाला असून पाणी पातळी ६४९.१५ मीटर इतकी आहे.तर एकूण साठा २३५.०५ दलघमी असून उपयुक्त साठा २०७.८६ दलघमी आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात ९२.०६ टक्के पाणी साठा होता. तर पाणी पातळी ६४८.५७ मीटर होती.
मागील वर्षी ता.२१ जुलै याच तारखेला चासकमान धरण लवकरच ९२.०६ टक्के भरल्याने धरणा मधून ५९९० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आहे होते. परंतु, ह्या वर्षी मात्र पावसाने जून महिना अखेरपर्यत दडी मारल्याने धरण लवकर भरते की नाही अशी शंका निर्माण झाली होती. परंतु १४ जुलै रोजी धरणात केवळ ३८ टक्के इतका असलेला पाणीसाठा ४५ तासांत तब्बल ७० टक्यांवर पहिल्यांदाच पोहचला आहे.
....................