चासकमानचे पाणी अजून पोहोचेना
By admin | Published: May 1, 2017 02:23 AM2017-05-01T02:23:38+5:302017-05-01T02:23:38+5:30
चासकमान धरणातून टेल टू हेड पाणी सोडण्यात आले आहे. मात्र अजून पाणी शेवटपर्यंत न पोहोचल्याने शिरूर
दावडी : चासकमान धरणातून टेल टू हेड पाणी सोडण्यात आले आहे. मात्र अजून पाणी शेवटपर्यंत न पोहोचल्याने शिरूर तालुक्यासाठी हे आवर्तन अजून किती दिवस चालणार, असा प्रश्न शेतकरी करू लागला आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना अजून आठ दिवस पाण्याची वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
धरणातून सोमवारपासून (दि. ३) डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स वेगाने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. यामध्ये ४५ दिवस चालणाऱ्या ह्या आवर्तनामध्ये ५ दिवस पाणीवहनासाठी २० दिवस शिरूरसाठी व २० दिवस खेड तालुक्यासाठी असे नियोजन या आवर्तनाचे करण्यात आले होते. मात्र आता २५ दिवस उलटूनही अजून खेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी खुले केले नाही. पाणीचोरी होऊ नये, म्हणून खेड तालुक्यात दावडी, निमगाव, रेटवडी, मांडवळा, टाकळकरवाडी येथे असलेल्या मोऱ्या-चाऱ्या मुरुम टाकून बंद करण्यात आल्या आहेत. तसेच डाव्या कालव्यावर असणाऱ्या कृषिपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कालव्यावरून पाणीचोरी करू नये, म्हणून रात्रंदिवस कालव्यावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. धरणामध्ये २०.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात मे महिन्याचा विचार केला असता काटकसरीने वापर करणे गरजेचे असताना आता हे ४५ दिवसांचे आवर्तन १० दिवस वाढून ५५ दिवसांचे होणार का? की खेड तालुक्यासाठी फक्त १० दिवसच पाणी मिळणार, अशा चिंतेत शेतकरी आहेत.