चासकमान धरणाचे पाणी तापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:24 AM2019-02-25T00:24:07+5:302019-02-25T00:24:17+5:30
धरणात केवळ ३0 टक्के पाणीसाठा : धरणावर अवलंबून गावांत तीव्र पाणीटंचाईची भीती
चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणात केवळ ३०.१६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला असून, धरणांतर्गत गावात पाणीप्रश्न निर्माण होणार आहे.
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे १ फेब्रुवारी रोजी रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन ४० दिवसांसाठी ‘टेल टू हेड’ पद्धतीने सुरुवातीला ५५० क्युसेक्स वेगाने सोडण्यात आले, तर कालवा कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा वेग वाढवत कालवा ५८० क्युसेक्स करून राजगुरुनगर शहराचा पाणीप्रश्न सुटावा, या उद्देशाने नदीपात्रात ९ तारखेला म्हणजेच, शनिवारी २७० असे एकूण कालव्याद्वारे ८५० क्युसेक्सने सोडण्यात आले होते; परंतु राजगुरुनगरचा बंधारा भरल्याने लगेचच दुसऱ्या दिवशी भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले; परंतु सध्या कालव्याद्वारे ५८० क्युसेक्स वेगाने पाणी चालू आहे.यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ५५० क्युसेक्स वेगाने पाणी सुरू असल्याने, धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, धरणांतर्गत असलेल्या बॅकवॉटरवरील गावातील पाणीसाठा संपुष्टात आला असून, परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर, शेतकºयांच्या शेतातील पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असून, धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणामध्ये २७ टक्के साठा कमी शिल्लक आहे.
चासकमान धरणातील पाणीसाठा ऐन फेब्रुवारी महिन्यात ३० टक्क्यावर आला आहे.
यावर्षी धरण शंभर टक्के भरल्याने खेडसह शिरूर अशा दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांबरोबरच नागरिक समाधानी होते; परंतु कालवा नियोजन समितीची बैठक घेऊन धरणातील पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करण्याची वर्षभराच्या आवर्तनाच्या तारखा जाहीर करण्याची मागणी पाणलोट, लाभक्षेत्रातील लाभार्थी शेतकºयांकडून दर वर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आली होती; मात्र आदिवासी भागातील शेतकºयांच्या दुर्दैवाने साठा शिल्लक राहील की नाही, याचा विचार न करता पाणी सोडण्यात आल्यामुळे आदिवासी भागातील शेतकºयांवर अन्याय केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.शेतकºयांच्या शेतात रब्बी हंगामाचे पीकच नसल्याने दुष्काळाचे सावट पडलेला हा भाग आताच पाणीटंचाईने हैराण झाला आहे. भीमा नदीवर ८.५३ टीएमसी क्षमता असलेले धरण म्हणजे, खेडसह शिरूर तालुक्यासाठी नंदनवन ठरलेले चासकमान धरण झाल्यापासून आजतागायतपर्यंत फक्त २०१५चा अपवाद वगळता दरवर्षी धरण शंभर टक्के भरलेले आहे; मात्र पाणीसाठा मुबलक असूनही दरवर्षी पाणी नियोजनाअभावी अमर्यादपणे पाणी आवर्तनात सोडल्याने मे महिन्याच्या अखेरीस धरणाचा पाणीसाठा उणे स्थितीत पोहोचतो.
या वर्षी पावसाने वेळेवर दमदार हजेरी लावल्याने पश्चिम भागात सलग तीन महिने पाऊस पडत राहिला, पर्यायाने मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी जुलै महिन्यातच सतर्कतेचा इशारा म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. मागील वर्षी १४ आॅगस्टला, तर चालू वर्षी सात जुलै रोजीच म्हणजेच सात दिवस आधीच धरण शंभर टक्के भरले. बोटावर मोजण्याइतके दोन बंधारे वगळता पाचही लघू प्रकल्प यंदा कोरडेच आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच पिण्याची पाण्याची ओरड सुरू झाली आहे. परतीच्या पावसाने भाताला दिलेला तडाखा, धरणात पाणी नसल्याने वाया गेलेला रब्बी हंगाम व आता जनावरे व माणसांना पिण्याच्या पाण्याची टंचाई असे भयानक दुर्भिक्ष असताना शिरूर भागातील उसाला पाणी देण्यासाठी शिरूर बरोबरच खेडचे सर्वच नेते एकवटल्याने आदिवासी भागातील शेतकरी मात्र दुष्काळात होरपळून निघत आहे.