सुजय विखेंच्या वक्तव्यावर छात्रभारती आक्रमक ; पाठवला दाेन हजारांचा चेक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:13 PM2019-10-07T16:13:45+5:302019-10-07T16:15:07+5:30
कमळाला मतदान करणार नसाल तर दाेन हजार रुपये परत करा असे वादग्रस्त वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केले हाेते. त्यावर छात्रभारतीने निषेध नाेंदवला आहे.
पुणे : कर्जत जामखेड येथे केंद्र सरकारने दिलेले दाेन हजार रुपये घेता आणि मत दुसऱ्या पक्षाला करता असे म्हणत, कमळाला मत देणार नसाल तर दाेन हजार रुपये परत करा असे विधान खासदार सुजय विखे पाटील यांनी केल्याचा आराेप छात्रभारतीकडून करण्यात आला आहे. छात्र भारतीकडून विखेंना दाेन हजारांचा चेक पाठविण्यात आला असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.
छात्रभारतीकडून एक प्रसिद्ध पत्रक काढण्यात आले असून यामध्ये सुजय विखे पाटील यांच्यावर आराेप करण्यात आले आहेत. खासदार सुजय राधाकृष्ण विखे यांनी कमळाला मत देणार नसला तर दाेन हजार रुपये परत करा या प्रकारचे विधान करुन राज्यातील शेतकऱ्यांच्या मताची किंमत करत शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. आमच्या मताची किंमत दाेन हजार रुपये ठरविणाऱ्या विखेंचा निषेध म्हणून आम्ही दाेन हजार रुपयांचा चेक पाठवून सुजय विखेंना आवाहन करत आहाेत की त्यांनी लाेणीमध्ये कमळाला साेडून काेणालाही मत द्यावे. असे पत्रात म्हंटले आहे.
छात्रभारतीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. रविंद्र मेढे म्हणाले, कर्जत जामखेडच्या विधानसभेच्या जागेसाठी सुजय विखे पाटील यांची सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मतदीचे दाेन हजारांचे चेक घेता आणि मत दुसऱ्या पक्षाला देता. कमळाला मत देणार नसाल तर दाेन हजार रुपये परत करा असे वक्तव्य विखे यांनी केले. हे त्यांचे विधान शेतकऱ्यांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आम्ही सुजय विखे पाटील यांना दाेन हजारांचा चेक पाठवून दिला आहे.