शंभू राजांच्या समाधीवर लोटला शंभूभक्तांचा महासागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 05:46 PM2018-03-17T17:46:05+5:302018-03-17T17:46:05+5:30

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढु बुद्रूक (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडे अकरा वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली.

chatrapati Shambhu king's samadhi place attending ocean of Shambhubhakta | शंभू राजांच्या समाधीवर लोटला शंभूभक्तांचा महासागर 

शंभू राजांच्या समाधीवर लोटला शंभूभक्तांचा महासागर 

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय मानवंदना , पुरस्कार वितरण व विविध कार्यक्रमशंभूछत्रपतींचा खरा इतिहासाचा पाठ्यपुस्तकात होणार समावेश

कोरेगाव भीमा: धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथे आज राज्यभरातून आलेल्या लाखो शंभुभक्तांनी समाधीस्थळावर पुष्पवृष्टीसाठी अलोटगर्दी केली होती. यावेळी शासकीय मानवंदनाही देण्यात आल्याने कार्यक्रमाला वेगळेच महत्व प्राप्त झाले. भीमानदी तीरावर श्री क्षेत्र वढु-तुळापूर या स्मारकांना जोडणारा पुलाच्या निर्मितीच्या मागणीस हिरवा कंदील मिळाल्याचे सुतोवाच मंत्रीमहोदयांनी दिल्याने यापुढील काळात वढु-तुळापुर-आळंदी-देहु तीर्थक्षेत्र जोडण्यास मदत होणार आहे. 
        यावेळी धर्मवीर श्रीशंभुछत्रपती अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप दिलीपबुवा भसे देहुकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढु बुद्रूक (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडे अकरा वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे , खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार बाबुराव पाचर्णे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सविता बगाटे, पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे, सदस्या सविता प-हाड , वढु बुद्रुकच्या सरपंच रेखा शिवले, उपसरपंच संजय शिवले, माजी सरपंच प्रफुल शिवले, यांसह स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील डॉ. अमोल कोल्हे, पल्लवी वैद्य, स्नेहलता वसईकर, शंतनु मोघे, प्राजक्त गायकवाड यांसह आदी मान्यवर व ग्रामस्थ लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. 
त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेज हक यांनी दिलेल्या आदेशानुसार, समाधी स्थळावर पोलिसांनी शासकीय मानवंदना दिल्याने बलिदान स्मरण दिनास वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी पै. संदिप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले पुरंदर ते श्री क्षेत्र वढु बुद्रूक - तुळापूर असा पालखी सोहळा व शिरुर-हवेली प्रासादिक दिंडीच्यावतीने आपटी ते वढु बुद्रूक अशी पालखी सोहळ्याचे समाधीस्थळावर आगमन झाल्याने सर्वत्र ‘ज्ञानोबा तुकाराम व छत्रपती संभाजीराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.  यावर्षीचा धर्मवीर  छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी महाराज मालिकेतील शंभूराजांची भुमिका साकारणाºया डॉ. अमोल कोल्हे यांना तर शंभूसेवा पुरस्कार इंदोर येथील युवराज विष्णु वस्ताद काशिद व गोकाकचे राजीव जाधव यांना प्रदान करण्यात  आला.
      यावेळी कार्यक्रमात धर्मसभेत विनोद तावडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘ मुख्यमंत्र्यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून याठिकाणी मला पाठविले असुन श्री क्षेत्र वढु बुद्रूक हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. राज्यशासनाच्या वतीने शंभु छत्रपतींच्या समाधीस्थळाचा विकास आराखडा तयार करुन जितके लागेल तितके पैसे खर्च करु असे आश्वासन दिले. समाजाच्या हिताच्या अनेक योजना शासनाच्या वतीने सुरु करण्यात आल्या आहेत.मराठा मोर्चाच्या मागणी पत्रावर निर्णय सुरु झाले आहेत. शिवशंभूंनी निर्माण केलेले स्वराज्य आपण सुजलाम सुफलाम करण्याचे काम करण्याची गरज असुन १ जानेवारीच्या दंगलीतील सर्व गुन्हे शासन मागे घेतील. यासाठी आमदार पाचर्णे आपण पाठपुरावा करा व याकामी मंत्री म्हणुन आढावा घेईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
      यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले की, याठिकाणी शंभूभक्त निवास उभारण्याची गरज असुन शासनाने वढु-तुळापुर समाधीस्थळाला राजमान्यता दिली आहे. या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करुन १०० कोटींचा निधी या विकास आराखड्यासाठी मंजुर करण्याची गरज असल्याचे सांगत वढू-तुळापुर या तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी तत्काळ निधी या अर्थसंकल्पात मंजुर करण्याची मागणी केली. तर शंभूछत्रपतींची ऐतिहासिक सर्व शस्त्रे , दस्तऐवज ठेवण्यासाठी याठिकाणी शासकीय संग्रहालयाची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगत १ जानेवारी दंगलीतील सर्व गुन्हे मागे घेण्याचीही विनंती शासनाकडे केली असल्याचे सांगितले. तर खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले,  १ जानेवारी पासुन परिसरात अशांतता असुन निष्पाप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे त्यावर ताबडतोब कार्यवाही करुन मराठा मोर्चाच्या वतीने शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे.
         या धर्मसभेनंतर पोवाडा सादर करण्यात आला. ग्रामपंचायत व धर्म्वीर संभाजीराजे युवा मंचा यांच्या माध्यमातुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे व नंदु एकबोटे यांनी शंभूराजांच्या समाधीच्या विकासासाठी मदत करण्याचे आवाहन शंभूभक्तांना केले.
........................
शंभूछत्रपतींचा खरा इतिहासाचा पाठ्यपुस्तकात होणार समावेश
आपल्या पुढच्या पिढीला शिवरायांचे प्रशासक नेर्तुत्व व शंभु छत्रपतींचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ठ करतानाच शंभू महाराजांचा ज्वाज्वल्य इतिहास समाजासमोर मांडण्यासाठी शंभू महाराजांच्या जीवनावरिल महानाट्य पुढिल पुण्यतिथीपासुन दरवर्षी वढु येथे सादर करण्यासाठी सांस्कृतिक विभाग पुढाकार घेईल 
                                                                                                                                                                                                     विनोद तावडे , शिक्षणमंत्री 
.............
 आपली माथी भडकवु देवु नका
        शिवरायांनी अठरा पगड जातीला बरोबर घेवून स्वराज्याची निर्मिती केली तेच स्वराज्य अठारा पगड जातीला बरोबर घेत राखण्याचे काम शंभूराजांनी केले असल्याने आपण हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपले माथे भडकवू देवू नका यासाठी डोक्यात शिवशंभूचा लोककल्यानकारी विचार जागृत ठेवण्याची आज गरज आहे.
                                                                                                                                                                                                  अभिनेते डॉ. अमोल कोल्हे.

Web Title: chatrapati Shambhu king's samadhi place attending ocean of Shambhubhakta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.