शिवाजी महाराज ‘विश्ववंदित:’ युगपुरुष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:25 AM2017-07-27T06:25:47+5:302017-07-27T06:25:49+5:30

छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रनिर्माते, समाजाची उभारणी करणारे नेतृत्व होते. त्यांनी आपल्याला जे दिले, ते खूप अपार आणि समृद्ध करणारे आहे. त्यामुळेच, शिवचरित्र अंगोपांगाने अभ्यासले पाहिजे. सामाजिक आक्षेप घ्यावा, असा एकही प्रसंग शिवरायांच्या आयुष्यात घडलेला नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व ‘विश्ववंदित:’ असे आहे. तरुणांनी शिवचरित्राचा सखोल आणि डोळस अभ्यास करावा, असे मत आज ९६ व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

chatrapati shivaji maharaj, news | शिवाजी महाराज ‘विश्ववंदित:’ युगपुरुष

शिवाजी महाराज ‘विश्ववंदित:’ युगपुरुष

googlenewsNext

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन नाट्यपूर्ण आणि विलक्षण शौर्याने भारावलेले होते. जगातील कोणत्याही योद्ध्याशी, सेनापतीशी तुलना अपुरी पडेल, अशा योग्यतेचे ते राजे होते. मुळात जे शिवचरित्र आहे, ते अभ्यासले जात नाही. शिवाजी महाराजांनी केलेला अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची तोडलेली बोटे, असा त्यातील केवळ नाट्यमय भाग उचलला जातो. परंतु, शिवरायांची महती त्याहीपलीकडची आहे. ते राष्ट्रनिर्माते, समाजाची उभारणी करणारे नेतृत्व होते. त्यांनी आपल्याला जे दिले, ते खूप अपार आणि समृद्ध करणारे आहे. त्यामुळेच, शिवचरित्र अंगोपांगाने अभ्यासले पाहिजे.
जीवनाची अनेक अंगे असतात. त्या प्रत्येक अंगाचा शिवाजी महाराजांनी डोळसपणे विचार केला. राज्यकारभार, शेती, अर्थव्यवहार, युद्धशास्त्र, मानवतेची दृष्टी अशा सर्व कंगोºयांचा त्यांनी नेहमीच बारकाईने विचार केला. सामाजिक आक्षेप घ्यावा, असा एकही प्रसंग शिवरायांच्या आयुष्यात घडलेला नाही. त्यांनी व्यसनाधीनता, स्त्रियांवरील अत्याचार, धर्मद्वेष, खोटा स्वधर्माभिमान आदी गोष्टींना थाराच दिला नाही. शिवचरित्राचे विवेचन अभ्यासपूर्ण आणि आधारपूर्वक करता आले पाहिजे. हे अभ्यासपूर्ण विवेचन पुढील पिढीपर्यंत पोचणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष या नात्याने खूप महान होते. ते ‘विश्ववंदित:’ आहेत. शिवाजी महाराजांनी राजमुद्रा तयार केली नाही. २८ जानेवारी १६४५ रोजी मुद्रा अस्तित्वात असल्याच्या नोंदी इतिहासात
आहेत. शिवरायांच्या गुणांनी
भारावून जाऊन शहाजीराजे यांनी संस्कृत पंडितांकडून ती तयार करून घेतली असावी. पुढील काळात राजमुद्रेवर लेखन करण्याचा माझा मानस आहे. चाणक्य, याज्ञवल्यक, सर्वश्रेष्ठ व्यास अशा दिग्गजांनी शिवचरित्र सांगावे, मी केवळ एक विद्यार्थी आहे. अजूनही मी शिवचरित्राचा अभ्यास करणारा कीर्तनकार, गोंधळी, भारुडी आहे.
अभ्यास नसताना बोलण्यापेक्षा तरुणांनी शिवचरित्राचा सखोल आणि डोळस अभ्यास करावा. त्यातून स्वत:चे जीवन, संसार धड करण्याची ताकद नक्कीच मिळेल. काय शिकावे, कोणाकडून शिकावे, हे शिवचरित्रातून शिकता येईल. कोणतीही मांडणी अभ्यासपूर्ण असावी. अभ्यासातून ज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक
रुंदावत जातात. इतिहासाबाबत पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असून चालणार नाही. शत्रूच्याही गुणांचा अभ्यास करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या वर्तनातून दाखवून दिले.
शिवरायांची युद्धनीती असामान्य होती. त्यांनी आरमारी, रणांगण, तसेच सर्व शास्त्रांमधील गनिमी कावा बारकाईने अभ्यासला. त्यांची तुलना योगेश्वर श्रीकृष्णाशी करण्याचा मोह मला आवरत नाही. अलौकिक मानवी गुण असलेले ते व्यवहारी, दक्ष, प्रजाप्रेमी राजे होते. मी लहान असताना वडिलांनी एक इंग्रजी पुस्तक वाचायला आणून दिले.
मला इंग्रजीचे अवाक्षरही वाचता येत नव्हते. त्यामुळे पुस्तक कसे वाचायचे, असा मला प्रश्न पडला. पुस्तकामध्ये भरपूर चित्रे होती. वडिलांनी चित्रांच्या माध्यमातून मला गोष्ट समजावून सांगितली. दृश्यमान ज्ञानावर माझा जास्त विश्वास आहे. त्यामुळे लहान मुलांना शिवराय समजून सांगताना चित्रांचा खूप उपयोग होऊ शकतो.
बोलक्या चित्रांमधून इतिहास समजून घेणे सोपे असते. गेल्या काही काळात शिवचरित्र आणि त्यातील व्यक्तिमत्त्वांशी संबंधित कलाकृतींची निर्मिती होऊ लागली आहे. शिवचरित्र समजून घेण्याच्या दृष्टीने अशा कलाकृती स्वागतार्हच आहेत. त्या अभ्यासपूर्ण रीतीने मांडल्यास पुढील पिढीला इतिहास अधिक चांगल्या पद्धतीने कळू शकतो.

 

Web Title: chatrapati shivaji maharaj, news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.