प्रेयसीच्या मोबाईलवरून कात्रज बोगद्याजवळ बोलावले अन् कापले गुप्तांग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 03:18 PM2022-11-14T15:18:27+5:302022-11-14T15:19:10+5:30
महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
धनकवडी (पुणे) : प्रेयसीला त्रास देणाऱ्या एका तरुणाचे प्रियकराने गुप्तांग कापण्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१२ रोजी) कात्रज परिसरात घडली. या प्रकरणी एका महिलेला अटक केली असून महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतो तर महिला बचत गट चालवत आहे. महिलेला आर्थिक गरज असल्याने तिने फिर्यादी काम करत असलेल्या फायनान्स मधून कर्ज घेतले होते. परंतु पुन्हा कर्जाची आवश्यकता असल्याने दोघांमध्ये चॅटींग सुरू होते. या चॅटींगच्या संदर्भात आरोपी महिलेच्या प्रियकराला माहिती मिळाल्यानंतर त्याने तिच्या मोबाईल नंबरवरुन चॅटींग करून फिर्यादीला कात्रज नवीन बोगदा परिसरातील स्वामी नारायण मंदिर येथे बोलावून घेतले. आरोपीसोबत आणखी एक साथीदार होता. या दोघांनी फिर्यादीला मारहाण केली नंतर दुचाकीवर मध्ये बसवून शिंदेवाडी येथील एका सुनसान जागेवर नेले.
गुप्तांग कापून डोक्यात मारहाण केली-
"तु तिला लॉजवर घेऊन जाणार का? तुला बायकांना फसवायला पाहिजे, थांब तुझा ... (गुप्तांग) च कापतो", असे बोलून फिर्यादीस खाली पाडून त्याला पकडून त्यातील एकाने त्याच्याकडील धारदार हत्याराने फिर्यादीचे गुप्त इंद्रियावरील कातडी काढून तेच हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले. त्यानंतर त्याला कात्रज परिसरातील एका हॉटेलजवळ सोडले.
भीतीमुळे दिली नाही तक्रार-
तेथून फिर्यादीने आई व भावास बोलावून घेतल्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र आरोपींच्या भीतीमुळे त्याने पोलिसांना माहिती दिली नाही. मात्र रुग्णालयातून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला फिर्याद देण्यास भाग पाडल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अंकुश कर्चे करत आहेत. आरोपी महिला सराईत गुन्हेगार निलेश वाडकरची पत्नी आहे. काही वर्षांपूर्वी पर्वती परिसरात पुर्व वैमनस्यातून त्याचा खून झाला होता.