इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार ….
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 02:05 PM2024-09-04T14:05:29+5:302024-09-04T14:06:16+5:30
आरोपींनी जून्या घटनेचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण याला जाळ्यात ओढले अन् भेटायला बोलावून वार केले
धायरी: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळील सीडब्लुपीआरएस कॉलनी गेटच्या समोर आज बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सागर चव्हाण (वय :१८, रा. लक्ष्मीनगर, कोथरुड) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाले आहेत. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या हर्षद संदीप वांजळे ( रा. वारजे जकात नाका) व धनराज सुनील पाटील(रा. नऱ्हे) या दोन तरुणांना दरोडाविरोधी पथकाने ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी सुमारे एक महिन्यापूर्वी इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून जखमी तरुणाला रिक्वेस्ट पाठवली. महिनाभर चॅटिंग केली. काल रात्री बोलणे झाले आणि आज सकाळी खडकवासला परिसरात भेटायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सागर चव्हाण आपल्या एका मित्राला सोबत घेऊन सकाळी लवकर किरकटवाडी फाट्याजवळ येऊन थांबला. तु कधी येतेय आम्ही पोहोचलोय, असा मेसेज करुन करंट लोकेशन पाठवले आणि तिथेच घात झाला.
इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार, पुण्यातील धक्कादायक घटना#Pune#Police#crime#instagrampic.twitter.com/dLCKEKOTkC
— Lokmat (@lokmat) September 4, 2024
सागर चव्हाण आणि त्याचा मित्र दुचाकीवर थांबलेले असताना अचानक दुसऱ्या दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून अज्ञात हल्लेखोर आले. एकाने दुचाकीला लाथ मारल्याने सागर चव्हाण खाली पडल्यानंतर त्याच्यावर कोयत्यांनी सपासप वार सुरू केले. सागरने हात मधे घातल्याने हाताला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपी दुचाकी घटनास्थळी सोडून किरकटवाडी गावच्या दिशेने फरार झाले.
जून्या घटनेचा बदला घेण्यासाठी...
दरम्यान जखमी सागर चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल असून त्याच्या सोबत असलेल्या मित्रावरही गुन्हा दाखल आहे. आरोपींनी जून्या घटनेचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण याला जाळ्यात ओढले आणि प्रेमाचे नाटक करुन भेटायला बोलावले. हल्ल्यासाठी आणलेली दुचाकी जुनाट असून त्यावर नंबर नाही. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून सुनियोजित पद्धतीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.