Chaturshringi Mata: शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होणार; भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 06:45 PM2021-10-06T18:45:03+5:302021-10-06T18:45:17+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना या वर्षी व्हीआयपी दर्शन व्यवस्था नाही
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी नवरात्र उत्सवात दर्शनाची ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली होती. यंदा भक्तगणांच्या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे यंदाच्या नवरात्र महोत्सवात भाविकांना मातेचे दर्शन घेता येणार आहे.
पुण्यातही चतु:शृंगी देवीच्या मंदिरात घटस्थापनेला येत्या गुरुवारपासून (७ ऑक्टोबर) ते विजयादशमी (१५ ऑक्टोबर) शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना ऑनलाईनबरोबरच दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती अध्यक्ष नीतीन अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त श्रीधर अनगळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
गुरुवारी सकाळी आठ वाजता अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना करण्यात येणार असून, दररोज सकाळी दहा आणि रात्री आठ वाजता महाआरती करण्यात येणार आहे. मंदिर सकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. दिलीप अनगळ या वर्षीचे मंदिर व्यवस्थापक असून, नारायण कानडे गुरुजी पौरोहित्य करणार आहेत. गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता नवचंडीचा होम करण्यात येणार असून, शुक्रवारी १५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त संध्याकाळी पाच वाजता मंदिर परिसरात विश्वस्त आणि सेवकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने सीमोल्लंघनाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सर्व विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
राज्य सरकारने ७ ऑक्टोबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भातील सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरात मुखपट्टीचा वापर बंधनकारक करण्यात आला असून. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, ताप मोजण्याची सोय करण्यात आली आहे.
महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा
सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे यासाठी दर्शन रांगेत भाविकांना उभे राहाण्यासाठी रंगांनी खुणा करण्यात आल्या आहेत. महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा असणार आहेत. कुटुंबियांना एकत्र पुरुषांच्या रांगेत प्रवेश मिळू शकेल. या वर्षी अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी (व्हीआयपी) स्वतंत्र रांग किंवा प्रवेशाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. शासनाच्या वतीने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करण्यात येर्इल.
भाविकांना देवीचे ऑनलाइन दर्शन घेता यावे यासाठी देवस्थानच्या वतीने विशेष सोय करण्यात आलेली आहे. भाविकांना chatturshringidevasthanpune.org या संकेतस्थळावर ऑनलाइन दर्शन घेता येईल किंवा फेसबुक पेज https://www.facebook.com/ChatturshringiDevasthan वर किंवा यूट्यूब https;//shortly.cc/Vqcvk या समाज माध्यमांवर दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांना देणगी देण्यासाठी jirnodhar@upi या अँपचा उपयोग करता येईल.