पुण्याचा चौकीदार पाणीचोर, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 02:07 AM2018-12-18T02:07:32+5:302018-12-18T02:07:53+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन : सत्ताधारी भाजपाच्याविरोधात घोषणा
पुणे : या बीजेपी सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा देत आणि सत्ताधारी भाजपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुण्याच्या पाण्याचा खेळ झाला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी महापालिकेत सोमवारी आंदोलन केले. पुण्याचा चौकीदार पाणीचोर अशा भाजपाच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
तुपे म्हणाले, की पाण्याचे नियोजन करण्यात भाजपाला पूर्ण अपयश आले आहे. कोट्यवधी रुपयांचा मलिदा जलसंपदाला देऊनही ते पुण्याला आवश्यक तेवढे पाणी द्यायला तयार नाही. भाजपाचेच सरकार राज्यात आहे. जलसंपदाचे मंत्रीही त्यांचेच आहेत. पुण्यात त्यांचे आठ आमदार, एक खासदार आहेत. तरीही पुण्याच्या पाण्याला राज्यात कोणी वाली राहिलेला नाही, असे झाले आहे.
बराटे, शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली. ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई असे पहिल्यांदाच झाले आहे व त्याला भाजपाचा नियोजनशून्य कारभार हेच कारण आहे, अशी टीका त्यांनी केली. बराच वेळ आंदोलन सुरू होते.
सर्वसाधारण सभेची वेळ झाल्यावर ते थांबवण्यात आले.
पायऱ्यांवरच बसले ठाण मांडून
महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, तसेच दोन्ही पक्षांचे महापालिकेतील सर्व नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महापालिका प्रवेशद्वाराच्या पायºयांवरच सर्व जण ठाण मांडून बसले. सर्वसाधारण सभा असल्यामुळे सोमवारी महापालिकेत बरीच गर्दी होती.