‘छावणी’ नाटक रंगभूमीला पेलवेना; नाटकाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी नाटककाराचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:49 PM2018-01-01T16:49:59+5:302018-01-01T16:53:44+5:30
नाटकाचा विषय वादग्रस्त आणि देशाच्या घटनेविरूद्ध आहे, असाच काहीसा गैरसमज नाट्यक्षेत्रात पसरल्याने ‘छावणी’ हे नाटक मराठी रंगभूमीला पेलवेना अशी दुर्दैवी स्थिती निर्माण झाली आहे.
नम्रता फडणीस
पुणे : ‘छावणी’ नाटक सेन्सॉर संमत होऊनही त्याच्या मागचे शुक्लकाष्ट काही अद्याप संपलेले नाही. नाटकाचा विषय वादग्रस्त आणि देशाच्या घटनेविरूद्ध आहे, असाच काहीसा गैरसमज नाट्यक्षेत्रात पसरल्याने या नाटकाचे दिग्दर्शनच काय पण निर्मितीची जबाबदारी घेण्याचे धारिष्ट्य एकही दिग्दर्शक आणि निर्माता दाखवू शकलेला नाही. त्यामुळे ‘छावणी’ हे नाटक मराठी रंगभूमीला पेलवेना अशी दुर्दैवी स्थिती निर्माण झाली आहे. याकरिता आता नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी स्वत:च या नाटकाबददलची चुकीची मानसिकता बदलण्याचा बिडा उचलला असून, या नाटकाच्या अभिवाचनाचे प्रयोग राज्यभर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यानुसार अभिवाचनाचा पहिला प्रयोग हा वर्धा येथे होणार आहे.
भारतातील कडव्या विचारसरणीच्या साम्यवादी संघटनांनी चालविलेल्या ‘नक्षलवाद’ चळवळीवर आधारित ‘छावणी’ हे नाटक आहे. १९६०च्या चीन व पाकिस्तान कराराच्या केंद्रस्थानी ठेवून प्रेमानंद गज्वी यांनी हे नाटक लिहिले आहे. भारताला नक्षलवादाचा किती धोका आहे, त्याची मांडणी नाटकात करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाडच्या सत्याग्रहादरम्यान डाव्या चळवळीच्या नेत्यांच्या उपस्थितीत ‘भांडवलशाही आणि ब्राम्हणशाही हे दलितांचे शत्रू आहेत असे विधान केले होते, तेच या नाटकाचे सूत्र आहे. माकर््स माओ उर्फ एमएम या भूमिकेभोवती कथानक गुंफण्यात आले आहे. नाटकाचा हा संपूर्ण आशयसार हे नाटक पाहाता नाटकाचा विषय वादग्रस्त आणि देशाच्या घटनेविरूद्ध आहे, असा ठपका ठेवत रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) तब्बल दीड वर्षे हे नाटक अडवले होते. या लढ्याला अखेर यश मिळून छावणीवर रोखलेल्या संगिनी सेन्सॉर बोर्डाला अखेर म्यान करण्याची वेळ आली. मात्र हे अर्धेच युद्ध गज्वी यांनी जिंकले. ज्याच्यासाठी हा संपूर्ण लढा दिला ते नाटक रंगभूमीवर यावे यासाठीची त्यांची धडपड अद्यापही संपलेली नाही.
अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना त्यांनी नाटकासाठी संहिता वाचायला दिली, मात्र नाटकाचा विषय रंगभूमीवर उभे करण्याचे शिवधनुष्य कुणीच पेलायला तयार नाही अशी स्थिती आहे. हे नाटक खूप ‘अॅग्रेसिव्ह’ आहे, पुण्यात हे नाटक दाखविले तर परत आपण आपल्या पायांवर घरी जाऊ शकू की नाही हे माहित नाही, अशी उत्तर त्यांना दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून दिली जात आहेत, त्यामुळे आता या नाटकाबद्दल निर्माण झालेले गैरसमज दूर करण्याची वेगळी लढाई गज्वी यांना लढण्याची वेळ आली आहे. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना नाटककार प्रेमानंद गज्वी म्हणाले, पुण्यातील एका दिग्दर्शकाला नाटकाची संहिता वाचायला दिली होती, तर तो म्हणे तू वेगळे नाटक लिहिणारा आहेस, मग टोकाचे नाटक का लिहिलेस? मी म्हणालो, लोकांचे प्रश्न,समस्या कुठलही सरकार आले तरी सुटलेल्या नाहीत. नाटकातील हा देशाचा नायक सगळ बदलून टाकेल अशी एक भावना आहे. त्यावर जरा नाटक ‘अग्रेसिव्ह’ वाटत आहे मग त्यात करूणेचा स्वर नाही का आणता येणार? असे तो दिग्दर्शक म्हणाला. मी त्यावर काहीच बोललो नाही. नाटकावर अशा वेगळ्या प्रतिक्रिया आहेत. खरेतर एक शब्दही न वगळता हे नाटक सेन्सॉर बोर्डाकडून संमत झालेले आहे. तरीही रिस्क घ्यायला कुणी तयार नाही. त्यामुळे आता या नाटकाच्या अभिवाचनाचे प्रयोग मी करणार आहे. पहिला प्रयोग वर्धा येथे होणार असून, त्यानंतर पुण्यातही करायचा विचार आहे. मसापच्या कार्याध्यक्षांशी देखील प्राथमिक चर्चा झालेली आहे.
‘छावणी’ पुस्तकरूपात प्रकाशित होणार
‘छावणी’ हे नाटक रंगभूमीपासून अद्याप वंचित असले तरी पुस्तकरूपात त्याची भेट लवकरच वाचकांना मिळणार आहे. हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर असून, येत्या मार्चमध्ये त्याचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे प्रेमानंद गज्वी यांनी सांगितले.