चाळकवाडीत रुंदीकरण पाडले बंद
By admin | Published: November 22, 2015 03:31 AM2015-11-22T03:31:01+5:302015-11-22T03:31:01+5:30
पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी विरोध अजून सुरूच आहे. ज्या बाधित शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांची प्रथम मोजणी करून नुकसानभरपाई
पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी विरोध अजून सुरूच आहे. ज्या बाधित शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांची प्रथम मोजणी करून नुकसानभरपाई द्या, अशी मागणी करीत शनिवारी चाळकवाडी येथील ग्रामस्थांनी पुन्हा काम बंद पाडले.
राजगुरुनगर ते सिन्नर या दरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी साठ मीटर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना तशा नोटिसाही देण्यात आल्या आहेत. परंतु, चाळकवाडी येथे प्रस्तावित टोलनाका असल्याकारणाने शेतकऱ्यांची फसवणूक करून अतिरिक्त जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. ज्या अतिरिक्त जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्या जमिनींच्या शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या नाहीत.
असे असतानाच काम सुरू करण्यात आले आहे. साठ मीटरमध्येच टोलनाका करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. असे असतानाही साठ मीटरपेक्षा जास्त जमीन संपादित करण्यात का आली? असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.
यापूर्वीही शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्या जमिनीची मोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या वेळी आठ दिवसांत तुमच्या जमिनीची मोजणी करून देऊ, महामार्गावर काम बंद करू नका, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना काम करू दिले. मात्र, आठ दिवसांनंतर तुमच्या जमिनी तुम्हीच मोजा, असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
शनिवारी (दि. २१) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बाधित शेतकरी आणि महिलांनी पुन्हा काम बंद केले. आमच्या अतिरिक्त संपादित केलेल्या जमिनी मोजून द्या.
ज्या क्षेत्राच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत तेवढेच क्षेत्र संपादित करा. तसेच नुकसानभरपाई देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. आता काहीही झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. आम्हाला कुठे न्यायचे तिकडे न्या. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. (वार्ताहर)
टोलनाका होता तेथेच?
पूर्वी ज्या ठिकाणी टोलनाका होता त्या ठिकाणी लोकवस्ती आणि शाळा असल्याचे कारण देत हा टोलनाका पाचशे मीटर अंतरावर पुढे घेण्यात आला. परंतू हा टोलनाका चाळकवाडी गावच्या हद्दीतच नको, अशीच मागणी प्रथमपासून आहे. असे असतानाही हा टोलनाका अवघ्या पाचशेच मीटर अंतरावर घेण्याचे कारण काय? ज्या ठिकाणी टोलनाका होणार आहे त्या ठिकाणीही लोकवस्ती आहेच ना? मग हा टोलनाका पाचशे मीटर अंतरावर पुढे घेण्याचे नाटक कशासाठी? त्यापेक्षा हा टोलनाका पहिला ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी घेण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे.