हायटेक जिल्ह्यात मरण झाले स्वस्त; उचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:08+5:302021-01-04T04:10:08+5:30
तळेघर : गर्भवती महिला व बाल मृत्युदर कमी करण्यासाठी शासन विविध योजना राबवून लाखो रूपये खर्च ...
तळेघर : गर्भवती महिला व बाल मृत्युदर कमी करण्यासाठी शासन विविध योजना राबवून लाखो रूपये खर्च करत आहे. मात्र, असे असतानाही आरोग्य व्यवस्थेत हायटेक असलेल्या पुणे जिल्ह्यात दुर्गम भागातील एका गर्भवती आदिवासी महिलेला वेळेवर रूग्णवाहिका तसेच उपचार न मिळाल्याने बाळासह जीव गमावावा लागल्याची धकादायक घटना उघडकीस आली आहे.
पुनम दत्तात्रय लव्हाळे असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात फलोदे येथे राहणाऱ्या या महिलेला २६ डिसेंबरच्या मध्यरात्री १.१५ वाजता प्रसूती कळा सुरू झाल्या. या महिलेच्या घरच्यांनी आशा स्वयंसेविका हिराबाई केंगले यांना ही माहिती दिली. आशा स्वयंसेविका व कुटुंबातील लोकांनी पुनम यांना तत्परतेने मध्यरात्री १.३० वाजता तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले. मात्र, येथे एकही डाॅक्टर नव्हते. रूग्णालयात असणाऱ्या अरोग्य सेविका शारदा उईके व सुरेखा सोयाम व कर्मचारी सोपान मोरमारे यांनी तात्काळ खाजगी गाडीने घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डाॅक्टरांनी दुरुनच पाहून प्रस्तुतीसाठी डाॅक्टर उपलब्ध नाही असे सांगत रात्री २.३० वाजता मंचर येथे पाठवले. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना रूग्ण असल्यामुळे येथे ही त्यांना दाखल करून घेतले नाही. यामुळे त्यांना मंचर येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, तेथेही डाॅक्टर उपलब्ध झाले नाही. यामुळे नातेवाइकांनी पूनम यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवले. त्यांनी रुग्णवाहिका मिळण्यासाठी धडपड सुरु केली. परंतु दोन तास १०८ व इतर रुग्णवाहिका मिळाल्या नाही. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर पहाटे ४.३० वाजता रुग्णवाहिका मिळाली. पुनम यांना सकाळी ७.३० वा.वाय.सी.एम. रुग्णालयामध्ये दाखल केले. डाॅक्टरांनी त्यांना तत्काळ प्रसूतीसाठी घेतले. मात्र तोपर्यंत पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता. बाळाच्या प्रसूतीनंतर महिलेनेही आपले प्राण सोडले.
चौकट
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यातील डोंगर दऱ्याखोऱ्यांमध्ये आदिवासी नागरिक राहतात. या भागामध्ये आरोग्य सेवा सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. आदिवासी जनतेचा आरोग्यविषय प्रश्न कायमचा मिटावा यासाठी शासनाने या भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली. लाखो रुपये खर्च करुन चांगल्या प्रकारच्या इमारती उभ्या केल्या. परंतु या दवाखान्यांमध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी हे वेळेवर उपलब्ध नसतात. तर काही ठिकाणी तज्ञ असा स्टाफ नसल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. या भागात राहणाऱ्या आदिवासी जनतेची आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती आहे. आई बाळाच्या मृत्यूमुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे शोभेची ठरले आहेत.
सुविधा नसल्याने गर्भवतींची गैरसोय नित्याचीच
दुर्गम भाग असल्याने येथील नागरिकांना पोटाची खळगी भरता भरता नाकीनऊ येतात.
आरोग्य सेवेसाठी मोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये जाण्याइतपत आर्थिक कुवत नसल्याने त्यांना प्राथमिक आरोग्ग्य केंद्राच्या सुविधेवर अवलंबून राहावे लागते. मात्र, येथे डॉक्टरच नसल्याने गर्भवती महिलांना तसेच गंभीर रूग्णांना आरोग्य सुविधा नाही. यामुळे त्यांच्यावर जीव गमवण्याची वेळ येते.
चौकट
शासकीय योजना केवळ कागदापुरत्या
शासनाने गर्भवती महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या. परंतु त्या योजना आदिवासी भागातील डोंगर दऱ्याखोऱ्यांमध्ये पोचतात की फक्त कागदोपत्री असतात याची शहानिशा होत नाही. या भागामध्ये आरोग्य आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा मिळाव्या या भागात काम करणारे वैद्यकीय अधिकारी २४ तास उपलब्ध व्हावेत या साठी अनेक संघटनांनी मोर्चे आंदोलने केली. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. लव्हाळे कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची आहे. मृत्यू झालेल्या
पूनम लव्हाळे यांचे पती दत्तात्रय लव्हाळे हे मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करतात. त्यांना दीड वर्षाचा एक मुलगा आहे. ह्या कुटुंबावर झालेल्या या आघाताने संपूर्ण कुटुंब हतबल झाले आहे.