रस्त्यावरील स्वस्त गॉगल करी डोळ्यांचा घात !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 04:41 PM2022-03-24T16:41:07+5:302022-03-24T16:42:57+5:30
स्वस्तातील गॉगल डोळ्यांसाठी घातकी...
पुणे : राज्यासह शहरातील तापमानाचा पारा ४० अंशांजवळ पोहोचला असून, या वाढत्या उन्हापासून डोळ्यांना संरक्षण देण्यासाठी रस्त्यांवर जागोजागी काळे चष्मे, गॉगल केवळ ९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत़ परंतु, उन्हाच्या तडाख्यात डोळ्यांना या गॉगलमुळे तात्पुरता दिलासा मिळत असला तरी, हे स्वस्तातील गॉगल डोळ्यांसाठी घातकी ठरत आहेत़ सदर गॉगलला लावलेली काळी फिल्म व रंगीत केमिकलमुळे डोळ्यांमधून पाणी येणे, जळजळ होणे आदी समस्यांना सामोरे जावे लागत असून, स्वस्तातील या गॉगल्सचा वापर टाळावा, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे़
उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी व उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात हवेत असलेल्या धुळीपासून बचाव करण्याकरिता गॉगलऐवजी आयएसआय मार्क हेल्मेट अतिउत्तमच आहे तर गॉगल्स वापरताना ते स्वस्त आहेत म्हणून न घेता डोळ्यांचा विचार करून, चांगल्या प्रतीचे गॉगल्स वापरणे हे नेहमीच फायदेशीर राहणार आहे़ त्यामुळे रस्त्यावर मिळणारा स्वस्तातील गॉगलचे कितीही चांगेल मार्केटिंग संबंधित विक्रेत्याने केले तरी, पैसे वाचविण्याचा हा मोह डोळ्यांच्या विकाराला आमंत्रण देणारा ठरणार आहे़.
ज्यांना चष्मा आहे अशांनी रस्त्यावरील गॉगल घेताना गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे़ स्वस्तातील या गॉगल्सला लावलेली फिल्म ही चष्म्याचा क्रमांक वाढविणारी ठरणारी आहे़ त्यामुळे ज्यांना चष्मा आहे अशांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच गॉगलचा वापर करावा. अन्यथा उन्हाबरोबरच धुळीपासून संरक्षण मिळविण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा़
पुणे शहरात सध्या तापमान ३९ अंशांवर पोहोचले आहे़ त्यामुळे डोळ्यांना उन्हाच्या झळांपासून संरक्षण देताना उन्हात गॉगल किंवा हेल्मेट वापराबरोबरच, डोळ्यांना गारवा मिळण्यासाठी वारंवार डोळे थंड पाण्याने धुणे आवश्यक आहे़ रस्त्यावर स्वस्तात उपलब्ध असलेले गॉगल्स हे डोळ्यांसाठी घातकी असून, प्रकर्षाने त्याचा वापर टाळावा़ जर गॉगल्स वापरायचा झाल्यास तो चांगल्या प्रतीचा घेणे हेच उत्तम राहील़ - डॉ़ प्रणव राडकर, नेत्रतज्ज्ञ पुणे़