स्वस्तात सोन्याचा मोह पडला ४३ लाख रुपयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:09+5:302021-05-08T04:11:09+5:30
सोन्याचा गंडा : भाग ४ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या मुकेश सूर्यवंशी ...
सोन्याचा गंडा : भाग ४
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या मुकेश सूर्यवंशी याने पुण्यातील एका महिलेला तब्बल ४३ लाख ८० हजार रुपयांना गंडा घातला होता. पुणे पोलिसांनी इंटरपोलमार्फत काढलेल्या लुकआऊट नोटिशीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडू शकला आहे.
याप्रकरणी बाणेर येथील एका २८ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादी यांची सूर्यवंशी याच्याशी जानेवारी २०१८ मध्ये ओळख झाली. त्यानंतर बाणेर येथील एका हॉटेलमध्ये ७ ते ८ वेळा भेट झाली होती. महिलेने आपल्याला एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करायची असल्याचे सांगितले. सूर्यवंशीने आपला सोन्याचा व्यवसाय असून त्यात गुंतवणूक करा, असे सुचविले. बाजारभावापेक्षा १० टक्के स्वस्तात सोने देण्याचे आश्वासन िदले. २७ हजार रुपये तोळा दराने सोने जादा फायदा मिळवू शकता. गुंतवणुकीच्या रकमेवर दर २५ दिवसांनी परतावा देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने नाशिकला जाऊन तो खरंच हा व्यवसाय करतो का याची खात्री केली. त्याच्या आईवडिलांना भेटल्या. त्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ६ फेब्रुवारी २०१८ पासून वेळोवेळी २ लाख ४० हजार, ९ लाख ६० हजार, १ लाख ५६ हजार, १४ लाख ९४ हजार, २ लाख ५० हजार ५ लाख व ४ लाख अशा प्रकारे मुकेश सूर्यवंशी याच्या बँक खात्यात पैसे भरत गेल्या. १७ मे २०१८ पर्यंत त्यांनी ४२ लाख ८० हजार रुपये मुकेश सूर्यवंशी याकडे गुंतवले. त्यावर मुकेश याने त्यांना १७ लाख ५९ हजार रुपये परतावा म्हणून पैसे देऊन त्यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र, त्यानंतर जुलै २०१८ नंतर त्याने या महिलेला परतावा देणे बंद केले. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्याची टाळाटाळ करु लागला. तेव्हा या महिलेने त्याचे वडील ईश्वर सूर्यवंशी यांना फोन करुन मुकेश पैसे देत नाही आणि सोनेही देत नसल्याचे सांगितले. तेव्हा ईश्वर सूर्यवंशी यांनी मी आता मीटिंगमध्ये आहे. मला १० लाख रुपये मिळणार आहेत. ती रक्कम मी तुला देतो, सध्या मला ५५ हजार रुपयांची गरज असे सांगून पैसे बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यांना ५५ हजार रुपये पाठविले. त्यानंतर मुकेश, याचे वडील ईश्वर, त्याची आई या सर्वांना फिर्यादी यांनी फोन करून पैशांची मागणी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मुकेश याने त्यांना पैसे परत केले नाही किंवा त्या किमतीची सोन्याची बिस्किटेही दिली नाही. शेवटी या महिलेने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी मे २०१९ मध्ये मुकेश सूर्यवंशी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, तोपर्यंत तो दुबईला पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलमार्फत लुकआऊट नोटीस सर्व देशांना बजावली होती.
तब्बल तीन वर्षे दुबईत राहिल्यानंतर तो मार्च महिन्यात गोव्याला परत आला. तेव्हा गोवा पोलिसांनी त्याला विमानतळावरच पकडले. याची माहिती पुणे पोलिसांना कळविली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ६ मार्च रोजी गोवा पोलिसांकडून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. मात्र, पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडून सोने अथवा रोख रक्कम हस्तगत करता आली नाही. त्यानंतर त्याला मुंंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.