स्वस्त तूरडाळ ३५ सेंटरवर
By admin | Published: August 20, 2016 05:26 AM2016-08-20T05:26:12+5:302016-08-20T05:26:12+5:30
शासनाच्या वतीने खुल्या बाजारात वाटप करण्यात येणारी स्वस्त तूरडाळ पुण्यात दाखल झाली असून, पुण्यासाठी सुमारे ४५ टन डाळ देण्यात आली आहे. या डाळीचे वाटप करण्यासाठी
पुणे : शासनाच्या वतीने खुल्या बाजारात वाटप करण्यात येणारी स्वस्त तूरडाळ पुण्यात दाखल झाली असून, पुण्यासाठी सुमारे ४५ टन डाळ देण्यात आली आहे. या डाळीचे वाटप करण्यासाठी पुणे शहरामध्ये ३५ ठिकाणी स्वतंत्र सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी तूर डाळीचा बफर स्टॉक उपलब्ध करून दिला आहे. यानुसार महाराष्ट्रासाठी सुमारे ४५ हजार मेट्रिक टन तूर उपलब्ध झाली आहे. या तुरीची भरड केल्यानंतर किमान ३० ते ३५ हजार मेट्रिक टन तूरडाळ विक्रीसाठी उपलब्ध होईल.परंतु केंद्र शासनाने ही तूरडाळ रेशनिंगवर विक्री करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे केंद्र शासनाकडून उपलब्ध झालेली तूरडाळ खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वरातीमागून घोडे : राज्य शासनाची तुरडाळ पुण्यात दाखल झाली असली तरी सध्या घाऊक बाजारात डाळीचे भाव सातत्याने खाली येत आहेत. शुकवारी घाऊकमध्ये हा भाव ८८ रुपये प्रतिकिलोपर्यंत उतरला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही डाळीचे भाव उतरू लागले आहे. शहरात ९५ रुपये किलो भावाने एका व्यक्तीस एक किलो अशी पध्दतीने डाळीची विक्री होणार आहे. एक किलोच्या पाकिटांवरही तसे स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. सुमारे ३५ लाख पुणेकरांसाठी सध्या ४५ टन डाळ आली आहे. तुरडाळीचे भाव १८० रुपयांच्या घरात गेल्यानंतरही राज्य सरकारने १०० रुपये किलोने डाळीची विक्री केली होती. आता हे भाव शंभरीत आल्यानंतरही ९५ रुपये किलोने विक्री होणार आहे.