मावस भावानेच व्यवसायात फसवले; आळंदीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:02 PM2017-10-13T14:02:27+5:302017-10-13T14:31:09+5:30
मानलेल्या मावस भावाने व्यवसायात फसवणूक केल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आळंदीत घडला.
लोणी काळभोर : भागीदारीत सुरू केलेल्या टुर्स अँन्ड ट्रँव्हल्सच्या धंद्यात मानलेल्या मावस भावानेच फसवणूक केल्याने आलेल्या नैराश्यातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आळंदी म्हातोबाची ( ता. हवेली ) येथे घडली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणांवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.
या घटनेंत रवी महादेव शेंडगे (वय ४५) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांची पत्नी शेंडगे (वय ३८, रा. मगरवस्ती, आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश शशिकांत कांबळे (रा. सर्वे क्रमांक ४६, धानोरी रोड, बुद्धविहाराजवळ, विश्रांतवाडी, पुणे ), अनिल बाळासाहेब जवळकर व विशाल निवृत्ती जवळकर (दोघेही रा.आळंदी म्हातोबाची, ता. हवेली), धनाजी जिजाबा गुंजवटे (रा. सोरतापवाडी, ता. हवेली), व मनोज अर्जुन गवळी (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरिक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार रवी शेंडगे हे घोरपडी, पुणे येथे जेवणाची मेस चालवत होते. त्यांचा मानलेल्या मावस भाऊ अंकुश कांबळे या दोघांनी पुणे येथील एका हॉटेलमध्ये एकत्र काम केले असल्याने दोघांची चांगली ओळख होती. ७ जुलै रोजी कांबळे हा शेडगे यांचे घरी आला व त्याने माझ्या विश्रांतवाडी, पुणे येथील टुर्स अँड ट्रँव्हल्सच्या व्यवसा य करार संपल्याने दुसरे ऑफिस टाकायचे आहे. सदर व्यवसाय आपण दोघे भागीदारीत करू मला टाटा कम्युनिकेशन सर्विस या कंपनीचे टेंडर मिळाले आहे. यासाठी तु तुझ्या ओळखीच्या व्यक्तींकडून गाड्या मागवून घे असे सांगीतले.
शेंडगे स्थानिक असल्याने सदर कामासाठी काही जणांनी गाड्या देण्याची तयारी दर्शवली. यानंतर कांबळे याने गाड्या आपण कंपनीला लावत आहोत त्या सर्व गाड्यांचा करार तुझ्या नावावर कर. प्रतिगाडी ५० हजार रूपये प्रतिमहा गाडीमालकांंस देण्यात येणार असून गाडीची नोंदणी करण्यांसाठी ५ हजार ५०० रूपये प्रतिगाडी घ्या असे शेंडगे यांना सांगीतले. त्यानुसार रवी शेंडगे यांनी अनिल जवळकर, विशाल जवळकर, धनाजी गुंजवटे, मनोज गवळी या चौघांसमवेत इतर ३६ असे एकून ४० जणांच्या गाड्यांचा करार त्यांनी आपल्या नावे करून घेतला. व प्रतिगाडी जमा केलेले ५ हजार ५०० रूपये त्यांनी कांबळे याचेकडे दिले. कांबळे याने गाड्या कोणत्याही कंपनीला लावल्या नाहीत हे लक्षात आल्यानंतर वरील चौघे शेंडगे यांच्याकडे पैशाची मागणी करू लागले. घरी येवून दमदाटी करून पैसे दे अन्यथा तुझे घर अामच्या नावावर कर अशी मागणी फोनवरून वारंवार करून शिवीगाळ, दमदाटी करू लागले.
९ ऑक्टोंबर रोजी त्यांनी घरांची सर्व कागदपत्रे नेली तेव्हापासून शेंडगे मानसिक तणावाखाली वावरत होते. अखेर त्यांनी ११ ऑक्टोंबर रोजी सर्वजण घरातझोपले असताना पहाटे ५च्या सुमारास घराच्या पत्र्याच्या छतास असलेल्या बांबूला नायलॉनची दोरी बांधून आत्महत्या केली.