लवासासारख्या प्रोजेक्टसाठी १०० कोटींचे कर्ज देण्याच्या आमिषाने फसवणूक करणारा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 09:17 PM2019-03-04T21:17:43+5:302019-03-04T21:19:38+5:30
लवासा सिटीसारखा प्रोजेक्ट बनविण्यासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून अल्प व्याजात मिळवून देण्याचे आमिष दाखवून खर्चासाठी म्हणून तब्बल ५५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एकाला दत्तवाडी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे़.
पुणे : लवासा सिटीसारखा प्रोजेक्ट बनविण्यासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून अल्प व्याजात मिळवून देण्याचे आमिष दाखवून खर्चासाठी म्हणून तब्बल ५५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एकाला दत्तवाडी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे़.
जतिन वीरेंद्र ध्रुव (वय ३३, रा़ कांदिवली, मुंबई) असे त्याचे नाव आहे़. त्याचा साथीदार जयेश नंदलालभाई गुंचाला हा फरार आहे़. गेली दोन वर्षे तो पोलिसांनी हुलकावणी देत होता़. या प्रकरणी पृथ्वीराज खामकर (रा़ तावरे कॉलनी, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरुन २०१६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, जतिन धु्रव हा ग्लोबल इन्फ्रा अँड फायनान्शिअल या कंपनीचा सीईओ असल्याचे भासवत होता़. या कंपनीमार्फत त्याने खामकर यांना ई मेले, एसएमएस करुन कंपनीच्या माध्यमातून लवासा सिटीसारखा मुळशी तालुक्यात १२०० एकर जागेवर प्रोजेक्ट बनविण्यासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था तसेच खासगी गुंतवणुकदारांकडून अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देतो असे सांगितले़ . हा प्रोजेक्ट ५५ हजार कोटी रुपयांना विकत घेतो, असे आमिष दाखविले़ त्यासाठी वेगवेगळ्या मिटिंग घेऊन तसेच कर्ज मंजूरी प्रक्रियेसंदर्भात बनावट मेल व एसएमएस पाठविले़ त्यांचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी ५५ लाख रुपये घेतले़. त्यानंतर कोणतेही कर्ज प्रकरण न करता पोबारा केला होता़.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर हे करीत होते़. जतिन हा गेली दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता़. तो कांदिवली येथे त्याची ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़. त्याअनुषंगाने त्याच्यावर पोलिसांनी १५ दिवसांपासून गुप्त पाळत ठेवली होती़. त्याचे राहते ठिकाण, घरात राहणाऱ्या व्यक्ती, तो नोकरी करीत असलेले ठिकाण, त्याच्या कामावर जाण्या येण्याच्या वेळा यांची माहिती गोळा करुन तो काम करीत असलेल्या बांद्रा येथील रिर्सजंट इंटिग्रेटस प्रा़ लि़ कंपनीतून त्याला नुकतेच ताब्यात घेण्यात आले़. सध्या तो पोलीस कोठडीत आहे़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, सहायक निरीक्षक शंकर सलगर, पोलीस शिपाई भारत आस्मर यांनी ही कामगिरी केली़.