गॅस एजन्सीच्या बहाण्याने फसवणूक
By admin | Published: January 2, 2015 01:33 AM2015-01-02T01:33:14+5:302015-01-02T01:33:14+5:30
आमिष दाखवून २५ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली येथील आरोपीला दीड वर्षानंतर पकडण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले आहे.
पुणे : दिल्ली येथे मंत्र्याची ओळख आहे असे सांगून गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली येथील आरोपीला दीड वर्षानंतर पकडण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. डी. चराटे यांनी आरोपीला ९ जानेवारीपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
हरिश कालीचरण शर्मा (वय ४२, रा. उत्तमनगर, नवी दिल्ली ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी रामकृष्ण बाबुराव मोरे (५६), सतिश कृष्णा चव्हाण (४८) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी मोनिका राजाराम काळे (२४) यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण हे काळेवाडी येथील एका सहकारी बॅैकेत नोकरीला आहेत. फिर्यादी काळे यांच्या चुलत्याचे परिचयातील चव्हाण हे आहेत. दोघांनी दिल्ली येथील हरिश शर्मा नामक व्यक्ती आमच्या ओळखीचे आहे व संबंधित खात्याचे मंत्री शर्मा याच्या ओळखीचे आहे. या ओळखीतून गॅस एजन्सी मिळवून देतो असे सांगून दोघांनी फिर्यादीकडून २० लाख रूपये घेतले. त्यानंतर हरित शर्माला बोलावून एजन्सीसंबंधीचा करार केला त्यसााठी पुन्हा ५ लाख रूपये घेतले. काही काळाने फिर्यादी यांनी कागदपत्रांची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)