नोकरीच्या आमिषाने फसवणूक
By admin | Published: June 27, 2015 03:46 AM2015-06-27T03:46:57+5:302015-06-27T03:46:57+5:30
भारत सरकारच्या किसान कॉल सेंटरमध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधिपदाच्या भरतीसाठी आॅनलाईन पद्धतीने मुलाखत घेऊन पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे,
पिंपरी : भारत सरकारच्या किसान कॉल सेंटरमध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधिपदाच्या भरतीसाठी आॅनलाईन पद्धतीने मुलाखत घेऊन पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे, अशा स्वरूपाची जाहिरात एका दैनिकात (‘ लोकमत’ नव्हे) देऊन अनेक जणांची फसवणूक केली आहे. मुलाखतीसाठी ई-मेल पत्त्यावर कागदपत्रे पाठवावीत व बँकेच्या खात्यात ११०० रुपये जमा करावेत. पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला आॅफर लेटर पाठविण्यात येईल, अशा प्रकारची जाहिरात दिली होती.
त्यासाठी अनेकांनी नोकरीसाठी अर्ज केले व बँक खात्यात पैसे जमा केले. मात्र, पैसे भरून अनेक दिवस झाल्यानंतरही कोणत्याही स्वरूपाची माहिती दिली गेली नाही. फोन केल्यानंतर कोणत्याही स्वरूपाचा प्रतिसाद संबंधित व्यक्तींनी दिला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे तरुणांच्या लक्षात आले. त्यांनी ‘लोकमत’कडे या संबंधात संपर्क साधला.
मुलाखतीसाठी कागदपत्रे पाठवल्यानंतर संबंधित उमेदवारांना एक आॅफर लेटर पाठविण्यात आले. त्यासोबत परत एक बँक खाते क्र मांक पाठवून तुमची निवड झाली आहे. तुम्हाला २५ हजार रुपये पगार दर महिना दिला जाईल. २०४३पर्यंत कंपनीने तुम्हाला करारबद्ध केले आहे, अशा स्वरूपाचे पत्र देण्यात आले. तुम्हाला घरबसल्या काम करता येईल. त्यासाठी दिलेल्या बँक खाते क्रमांकावर लॅपटॉप मिळण्यासाठी १२ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. मात्र, संबंधित तरुणाने ९ हजार ५०० रुपये जमा
केले. त्यानंतर परत फोन करून
कंपनीने तुम्हाला लॅपटॉप दिला आहे.
तो कुरिअर करण्यासाठी १०,०००
रुपये भरा, असे सांगण्यात आले.
त्यानंतर ते पैसे भरण्यास असमर्थता दाखविली. त्यानंतर पैसे परत मिळावेत, यासाठी पीडित तरुणाने कंपनीच्या क्रमांकावर संपर्क साधला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)