नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:20 AM2018-08-25T02:20:51+5:302018-08-25T02:21:37+5:30
नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणीकडून वेळोवेळी ५४ हजार रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली.
पुणे : नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणीकडून वेळोवेळी ५४ हजार रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने दोघांना २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
पिंटूकुमार यादव आणि सतीशराज यादव (वय २२, दोघेही रा. दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. २२ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ ही घटना घडली. फिर्यादी यांनी नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोकरीसाठी बायोडाटा भरून रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर २२ डिसेंबरला त्यांना फोन आला व २ हजार १०० रुपये बँक खात्यावर भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी पैसे बँक खात्यावर भरले. त्यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी एकूण ५४ हजार रुपये भरले. मात्र, आरोपींनी नोकरी न लावता तसेच भरलेले पैसे परत न करता, फिर्यादी यांची फसवणूक केली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांनी इतर आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? याचा शोध घेण्यासाठी, त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का? याचा शोध घेण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी केली.