स्वस्त मोबाईलच्या आमिषाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:11 AM2020-12-06T04:11:48+5:302020-12-06T04:11:48+5:30
पुणे : स्वस्तात मोबाईल विकण्याच्या आमिषाने किराणा दुकानदाराला एका चोरट्याने १२ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी राजू चौधरी (वय ...
पुणे : स्वस्तात मोबाईल विकण्याच्या आमिषाने किराणा दुकानदाराला एका चोरट्याने १२ हजार रुपयांचा गंडा घातला.
याप्रकरणी राजू चौधरी (वय ३०, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चौधरी यांचे आनंदनगर भागात किराणा दुकान आहे. त्यांच्या मोबाईलवर बाजारभावापेक्षा स्वस्तात २ हजार ९९९ रुपयात मोबाईल मिळेल, असा मेसेज आला. त्यांच्या दुकानातील ४ कामगारांना नवीन मोबाइल खरेदी करायचे होते. मोबाइल संदेशात चोरट्यांनी एक लिंक पाठविली होती. चौधरी यांनी लिंक उघडून पाहिली. चोरट्यांनी चौधरी यांना एका अॅपद्वारे पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार चौधरी यांनी एकूण मिळून १२ हजार रुपये चोरट्यांनी दिलेल्या अॅपवर जमा केले. दरम्यान, मोबाइल संच न मिळाल्याने चौधरी यांनी पुन्हा लिंक उघडली. तेव्हा लिंक बंद असल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे करत आहेत.