स्वारगेट बस स्टँडवर प्रवाशांची लूट, १५ रुपयांचं 'नाथजल' २० ₹ ने होतंय विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 02:56 PM2023-03-22T14:56:09+5:302023-03-22T14:57:35+5:30
पुणे शहरात स्वारगेट आणि शिवाजीनगर ही दोन मुख्य बसस्थानके आहेत.
नितीश गोवंडे
पुणे - राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी माफक दरात बाटलीबंद पाण्याची सोय व्हावी म्हणून 'नाथजल' ही योजना सुरू केली. काही विक्रेते मात्र याचा गैरफायदा घेत १५ रुपये छापील किंमत असताना कूलिंग चार्जच्या नावाखाली ५ रुपये वाढवून २० रुपयाला एक पाण्याची बाटली विकत आहेत. स्वारगेट बसस्थानकावरील जय काळभैरवनाथ एंटरप्रायजेस हे एसटी महामंडळाचे अधिकृत विक्रेते असून, त्यांच्याकडून प्रवाशांची लूट खुलेआम सुरू आहे. यासंबंधी जागरूक नागरिकांनी एसटी प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील विक्रेत्याची मुजोरी थांबण्यास तयार नाही.
पुणे शहरात स्वारगेट आणि शिवाजीनगर ही दोन मुख्य बसस्थानके आहेत. या बसस्थानकावरील अधिकृत विक्रेत्यांना 'नाथजल' विकण्याची सक्ती आहे. या पाण्याच्या बाटलीवर १५ रुपये छापील किंमत असताना, एमआरपीपेक्षा अधिक भावाने वस्तू विकणे हा गुन्हा असतानादेखील दररोज जय काळभैरवनाथ एंटरप्रायजेसच्या अपर्णा आनंद रांबाडे या खुलेआम अधिकचे ५ रुपये घेऊन चढ्या भावात पाणी विकत आहेत.
५ रुपये भुर्दंड
सोमवारी (दि. २०) रोजी 'लोकमत'ने प्रवाशांच्या तक्रारीनंतर या दुकानात जाऊन प्रत्यक्ष पाण्याची बाटली विकत घेतली असता ती २० रुपयांना देण्यात आली. यावेळी यावर १५ रुपये किंमत आहे असे मग ५ रुपये जास्त का? असे विचारले असता 'कूलिंग चार्ज'चे ५ रुपये असे उत्तर देण्यात आले.
एसटीने दंड ठोठावूनही जैसे थेच
प्रवासी अक्षय भुमकर हे ११ मार्च रोजी पुणे पंढरपूर प्रवासासाठी स्वारगेट एसटी स्थानकावर आले होते. त्यांनी या दुकानातून पाण्याची बाटली विकत घेतली असता, त्यांच्याकडूनदेखील २० रुपये आकारण्यात आले. यानंतर भूमकर यांनी बसस्थानक प्रमुखांकडे लिखित, ई-मेलद्वारे आणि पोस्टाद्वारे तक्रार केली. यानंतर १५ मार्च रोजी एसटी महामंडळाकडून दीड हजार रुपयांची दंडात्मक कारवाईदेखील या महिलेवर केली. त्यानंतर २० मार्च रोजी 'लोकमत'ने मुद्दाम तेथे जाऊन पाणी बॉटल विकत घेतली असता त्यांनी २० रुपये दरानेच ती विकली.
कंत्राट रद्द करा
एसटी प्रशासनाने दंडात्मक कारवाई करूनदेखील अशाप्रकारे हे विक्रेते त्याच पद्धतीने सर्वसामान्यांची लूट करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांचे कंत्राट रद्द करणे गरजेचे आहे. त्यापेक्षा एखाद्या गरजवंताला ते कंत्राट दिले तर योग्य दरात पाणी मिळेल.
सर्वसामान्यांची होतेय लूट
शहरातील पार्किंग असो,रेल्वेस्थानकावरील पार्किंग असो अथवा
स्वारगेट बसस्थानकावरील पाणी विकत घेणे असो, या शहरात प्रत्येक ठिकाणी वारंवार सर्वसामान्यांची लूट होत असल्याचे 'लोकमत'ने वारंवार केलेल्या स्टिंगवरून समोर येत आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना एका पाण्याच्या बाटलीमागे ५ रुपये अधिक द्यावे लागत असतील तर ही लूट कधीपर्यंत सहन करायची, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.