"फर्निचरसाठी पैसे पाठवा..."; पोलीसाच्या नावाने पैसे मागून नातेवाईकांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: July 27, 2023 15:46 IST2023-07-27T15:45:40+5:302023-07-27T15:46:07+5:30
सायबर चोरट्यांनी पोलिसाचे फेक अकाउंट तयार केले...

"फर्निचरसाठी पैसे पाठवा..."; पोलीसाच्या नावाने पैसे मागून नातेवाईकांची फसवणूक
पुणे : पोलीस निरीक्षकाचे फेसबुकवर अकाउंट हॅक करून नातेवाइकांचीच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर चोरट्यांनी फर्निचरचे फोटो पाठवत पैसे पाठवायला भाग पाडून ६९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत स्वागत नवनाथ गोसावी (वय ३६, रा. हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोसावी यांचे चुलते संतोष गिरीगोसावी (रा. खराडी) हे पोलीस निरीक्षक आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांचे अकाउंट हॅक करून त्या अकाउंटचा वापर करत स्वागत गोसावी यांना मेसेज केला.
गोसावीला संतोष गिरीगोसावी हेच मेसेज करत आहेत असे वाटले. त्यांनतर फिर्यादी यांना दिलेल्या नंबरवर फोन करण्यास भाग पाडले. त्या मोबाईल नंबरवरुन फिर्यादी यांना व्हॉटसअपवर फर्निचरचे फोटो पाठवले आणि तत्काळ ६९ हजार ९९९ रुपये पाठविण्यास भाग पाडले. स्वागत गोसावी यांनी पैसे पाठवल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप शिवले पुढील तपास करीत आहेत.