क्रेडिट कार्ड बंद होण्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:48+5:302021-04-20T04:11:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एका ज्येष्ठ नागरिकाला क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करून गोपनीय माहिती घेऊन सायबर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एका ज्येष्ठ नागरिकाला क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करून गोपनीय माहिती घेऊन सायबर चोरट्यांनी १ लाख ८६ हजार रुपयांना गंडा घातला. केंद्र सरकारने बँका एकमेकात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी फसवणुकीचा नवा फंडा निवडला आहे.
सिंहगड रोडवरील आनंदनगर येथे राहणाऱ्या एका ७६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना ९ नोव्हेंबर रोजी एकाने फोन करुन बँक ऑफ बडोदा एल बीएस रोड या शाखेतून बोलत असल्याची बतावणी केली. विजया बँक ही आपल्या बँकेत विलीन होणार आहे. तुमचे क्रेडिट कार्डस बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे कार्ड चालू ठेवायचे असेल, तर मी विचारेल तरी सगळी माहिती द्या, असे फिर्यादीला सांगून त्यांच्याकडून सगळी गोपनीय माहिती विचारली. त्यानंतर त्यांच्या दोन बचत खात्यामधून १ लाख ८६ हजार ९०० रुपये ऑनलाईन व्यवहार करून काढून घेऊन फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे अधिक तपास करीत आहेत.
.........
सायबर चोरट्यांचा नवा फंडा
केंद्र सरकारने नुकताच पाच बँका इतर मोठ्या बँकांमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जुन्या बँकांचे चेक बुक व इतर बाबी बदलून घेण्याचे आवाहन बँकांकडून केले जात आहे. त्याचाच गैरफायदा आता सायबर चोरटे घेऊ लागल्याचे दिसून येत आहे. कोणतीही बँक ग्राहकांना फोन करुन त्यांची गोपनीय माहिती विचारत नाही, त्यामुळे अशा फोनवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.