पाणी मीटरची गुणवत्ता जर्मनीत तपासणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 01:54 AM2018-09-18T01:54:09+5:302018-09-18T01:54:33+5:30
शहराची बहुचर्चित २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पुण्यात प्रथमच एएम आर पद्धतीचे पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत.
पुणे : महापालिकेने हे मीटर तयार करण्याचे काम एल अँड टी कंपनीला दिले असून, त्यांनी जर्मनीतील सेनसेस या कंपनीला ते काम दिले आहे. त्यामुळे शहरात हे मीटर बसविण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी पालिकेचे दोन अधिकारी १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान जर्मनीला जाणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या परदेश दौºयाला सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली.
शहरात २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. सहा टप्प्यांत या योजनेचे काम केले जाईल. या योजनेत नवीन पाणी मीटर बसविले जातील. पाणी मीटर बसविण्याचे काम एल अँड टी कंपनीला मिळाले आहे. या योजनेसाठी प्रथमच एएम आर पद्धतीचे पाणी मीटर बसवण्यात येणार आहेत. हे मीटर तयार करण्याचे काम एल अँड टी या ठेकेदाराने जर्मनीतील सेनसेस यांना दिले आहे. या मीटरला नियुक्त केलेल्या सल्लागाराने मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने जर्मनीतील फॅक्टरीत उत्पादन सुरू केले आहे. पुणे पालिका हे पाणीमीटर पहिल्यांदाच वापरणार आहे. त्यामुळे त्यांची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे.
निविदेतील अटींप्रमाणे कंपनीकडून खर्च
निविदेमधील अटी आणि शर्तीप्रमाणे या तपासणीसाठी दोन अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. त्यात पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी आणि पाणीपुरवठा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांचा समावेश आहे. हे अधिकारी १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान जर्मनीला जाणार आहे.
या अधिकाºयाच्या जाण्या-येण्याचा आणि निवासाचा खर्च एल अँड टी करणार आहे. हा कालावधी सेवाकाल म्हणून धरण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.