घरी ऑक्सिजन पातळी तपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:27+5:302021-05-05T04:15:27+5:30
१०-१५ टक्के रुग्णांमध्येच दिसतोय पॅटर्न, वॉक टेस्टवर द्यावा भर प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ...
१०-१५ टक्के रुग्णांमध्येच दिसतोय पॅटर्न, वॉक टेस्टवर द्यावा भर
प्रज्ञा केळकर-सिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे बदलली आहेत. त्याचप्रमाणे रुग्ण गंभीर होण्याचा पॅटर्नही बदलल्याचे दिसत आहे. कोरोनाचे निदान झाल्यावर सहाव्या-सातव्या दिवशी रुग्णांची प्रकृती अचानक ढासळत आहे. पहिले चार-पाच दिवस किरकोळ लक्षणे दिसल्यानंतर, सहाव्या-सातव्या दिवशी अचानक ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांनी घरच्या घरी करता येणाऱ्या सोप्या उपायांवरून शरीराची ऑक्सिजन पातळी तपासावी आणि ती कमी झाली तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा. त्यामुळे गंभीर अवस्थेत रुग्णांना घेऊन धावपळ करण्याची गरज भासत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही वाढली आहे. पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला ऑक्सिजन पातळी खालावल्याने रुग्णालयात भरती होण्याची वेळ येते. ऑक्सिजनची नियमितपणे नोंद ठेवणे, कोणतेही वेगळे लक्षण दिसल्यास किंवा त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे यावर भर दिल्यास धावपळ टाळता येऊ शकते.
------
कोरोना संसर्गाचा सुरुवातीला अनेकांना ताप येतो. या कालावधीत दिसणारी लक्षणे ही व्हायरल इन्फेक्शनच्या जवळ जाणारी असतात. पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला इम्युनिटी डिसरेग्युलेशन अर्थात प्रतिकारशक्तीचे असाधारण रुप दिसू लागते. या काळात प्रतिकारशक्ती उग्र स्वरूपात प्रतिसाद द्यायला लागते. पहिल्या आठवड्यातील लक्षणे ही संसर्गामुळे, तर दुसऱ्या आठवड्यातील लक्षणे ही प्रतिकारशक्तीमुळे निर्माण होऊ लागतात. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला श्वास घ्यायला अचानक त्रास होऊ लागतो, ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते. अशा वेळी रुग्ण होम क्वारंटाईन असले तरी लक्षणांवर आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासावर बारकाईने लक्ष ठेवणे हा एकच उपाय आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 80 ते 85 टक्के रुग्ण पहिल्या टप्प्यातच बरे होतात. इतर दहा ते पंधरा टक्के रुग्णांमध्ये प्रतिकारशक्तीचे असाधारण रूप दिसू लागते.
सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असलेले जे रुग्ण घरीच विलग झालेले असतात, त्यांनी दिवसातून किमान तीन-चार वेळा ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ऑक्सिजनची पातळी तपासावी. सहा मिनिटे सपाट पृष्ठभागावर चालावे आणि त्यानंतर पुन्हा ऑक्सिजनची पातळी तपासावी. सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी तीन किंवा चारने कमी झाली असल्यास आपल्या शरीराला ऑक्सिजनची उणीव भासत आहे, असे समजावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात भरती होण्याबाबत निर्णय घ्यावा. घरच्या घरी करता येणाऱ्या या सोप्या उपायांमुळे शरीराची ऑक्सिजनची गरज लक्षात येते. त्यामुळे गंभीर अवस्थेत रुग्णांना घेऊन धावपळ करण्याची गरज भासत नाही.
- डॉ. नितीन अभ्यंकर, फुफ्फुसविकार तज्ज्ञ, पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
-----
कोरोनाच्या पहिला लाटेमध्ये रुग्णांना सुरुवातीला ताप यायचा. दुसऱ्या लाटेत मात्र ताप सातत्याने येताना दिसत आहे. रुग्णांची तीन-चार दिवसांनी एचआरसीटी टेस्ट केल्यास तो स्कोअर पाच ते सहा इतका असतो. सात ते आठ दिवसांनी एचआरसीटी स्कोअर अचानक १२ ते १५ पर्यंत वाढल्याचे लक्षात येते. रॅपिड न्यूमोनायटिसमुळे ही तफावत दिसते. त्यामुळे ऑक्सिजनची पातळीही कमी होते आणि रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज भासते. सध्याच्या पॅटर्ननुसार केवळ सहव्याधी असलेल्या रुग्णांनाच नव्हे तर तरुणांनाही हा त्रास होताना दिसत आहे.
- डॉ. रोहिदास बोरसे, विभागप्रमुख, अतिदक्षता विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय