नैराश्यावर पुस्तकामुळे मात : बी. एन. गोखले; ‘अपराजित’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:27 PM2018-01-16T12:27:04+5:302018-01-16T12:29:52+5:30
आजकाल आपण बघतो की छोट्या छोट्या प्रसंगांनी लोक निराश होतात, नैराश्यावर मात कशी करायची याचे शिक्षण हे पुस्तक देते.’’ असे मत एअर मार्शल (निवृत्त) बी. एन. गोखले यांनी व्यक्त केले.
पुणे : ‘‘आजकाल आपण बघतो की छोट्या छोट्या प्रसंगांनी लोक निराश होतात, आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतात; पण अनिलकुमारचे चरित्र वाचल्यानंतर असे वाटते की आपले दु:ख हे त्याच्यापुढे काहीच नाही आहे. नैराश्यावर मात कशी करायची याचे शिक्षण हे पुस्तक देते.’’ असे मत एअर मार्शल (निवृत्त) बी. एन. गोखले यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत असताना दिवंगत फ्लाइंग आॅफिसर एम. पी. अनिलकुमार यांना अपघातामुळे आलेले विकलांगत्व आणि त्यांनी या विकलांगतेवर मात करण्यासाठी दिलेली अभूतपूर्व झुंज यावर आधारित ‘अपराजित’ पुस्तक प्रकाशन (जीवनचरित्र) सोहळ्यात ते बोलत होते. मनोविकास प्रकाशनतर्फे गरवारे कॉलेज आॅफ कॉमर्स येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, अनिलकुमारचे भावपूर्ण शब्दांत इंग्रजीमध्ये जीवनचरित्र साकारलेले नितीन साठे, सदर पुस्तकाच्या मराठी अनुवादिका सुनीती जैन आदी उपस्थित होते.
या वेळी अनुवादिका सुनीती जैन म्हणाल्या, अनिलकुमारचा २४व्या वर्षी अपघात झाला आणि पुढची २६ वर्षे त्याने नियतीशी झगडत सैनिकांच्या पुनर्वसन केंद्रात काढले. हे इतके सोपे काम नव्हे. अनिलकुमारचे भविष्य उज्वल असताना २४व्या वर्षी त्याच्या करियरला इतका करकचून ब्रेक लागला, ज्यामध्ये त्याचं सगळं भवितव्य उद्ध्वस्त झालं. त्या वेळी तोही नैराश्यामध्ये गेला. पण तिथले कर्मचारी, त्याचे कुटुंबीय, त्याच्या गावातील लोकांनी मिळून त्याला प्रोत्साहन दिले. आणि तो शेवटी तोंडात पेन धरून लिहायला लागला. त्याच्या लिहिलेल्या लेखांमुळे त्याचे खूप नाव झाले. या माध्यमातून त्याच्यासाठी जगाचा एक मोठा दरवाजा उघडा झाला आणि त्याच्यातून त्याला जगण्याचा अर्थ सापडला. त्याने खूप लेख लिहिले. बरोबरच्या मित्रांच्या अडचणी सोडवल्या. अशा प्रकारे त्याने अनेकांना मदत केली. सूत्रसंचालन अरविंद पाटकर यांनी केले.