T20 वर्ल्ड कप विजयानंतर जल्लोष करणाऱ्यांवर दादागिरी; खाकी वर्दीत तरुणांना मारहाण करणारा तोतया पोलीस गजाआड
By नितीश गोवंडे | Published: July 1, 2024 04:13 PM2024-07-01T16:13:24+5:302024-07-01T16:13:54+5:30
तोतया पोलिसाकडून बनावट ओळखपत्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) ओळखपत्र, तसेच पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला
पुणे: भारताने टी २० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. यानंर पुणेकरांनी रस्त्यावर उतरून हातात तिरंगा घेऊन जल्लोष केला. या जल्लोष करणाऱ्या नागरिकांना खाकी वर्दी घालून धमकावणाऱ्या आणि तरुणांना मारहाण करणाऱ्या एका तोतया पोलिसाला विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांचे बनावट ओळखपत्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) ओळखपत्र, तसेच पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला आहे.
सुमंत किशोर पार्टे (२२, रा. शोभा टॉवर, पुना हॉस्पिटलजवळ, नवी पेठ) असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. सुशांत मुळचा रायगडचा रहिवासी आहे. याप्रकरणी पोलिस नाईक राहुल सोनार यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी (दि. २९) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अलका चित्रपट गृहाजवळ घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शनिवारी मध्यरात्री भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन विश्वचषक जिंकला. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात तरुण जल्लोष करत होते. अलका टॉकिज जवळ काही तरुण जल्लोष साजरा करत होते. त्यावेळी खाकी रंगाची पँट परिधान केलेल्या सुमंत पार्टे याने जल्लोष करणाऱ्यांना हटकले. त्यांना बंदुकसदृश्य वस्तूने मारहाण केली. दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना धमकावून मारहाण केली.
दरम्यान, काही तरुणांना तो पोलिस नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पार्टेला ताब्यात घेतले. त्याने पोलिस असल्याची बतावणी करुन आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पार्टेला पोलिसांनी अटक केली असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.