निरा नृसिंहपूर मूर्तीवर रासायनिक लेपन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 08:12 PM2018-09-26T20:12:02+5:302018-09-26T20:19:18+5:30

इंंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपूर मंदिरातील मूर्ती वालुकामय पाषाणाची आहे असा समज होता. त्यामुळे मूर्तीचा काळ ठरविता आला नव्हता.

Chemical imitation on nira narshingpur murti | निरा नृसिंहपूर मूर्तीवर रासायनिक लेपन

निरा नृसिंहपूर मूर्तीवर रासायनिक लेपन

googlenewsNext
ठळक मुद्देमूर्ती काळ्या पाषाणाची : १४०० वर्षे जुनीपुरातत्व खात्याकडून त्यावर रासायनिक लेपन करून तिचे संरक्षण 20 सप्टेंबरला मूर्तीच्या संरक्षणाचे हाती घेतलेले काम पूर्णरासायनिक संरक्षणामुळे पुढील वीस वर्ष ती टिकणार

पुणे :  इंंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपूर मंदिरातील मूर्ती वालुकामय पाषाणाची आहे असा समज होता. त्यामुळे मूर्तीचा काळ ठरविता आला नव्हता. मात्र, हा भ्रम आता दूर झाला आहे. राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने मूर्तीवरचे मूळ लेपन काढून टाकल्याने मूळ मूर्ती ही काळ्या पाषाणाची (बेसाल्ट) असून, पाचव्या शतकातील समकालीन मूर्तीशी साम्य दर्शविणारी असल्याचे समोर आले आहे. या मूर्तीच्या दृढीकरणासाठी पुरातत्व खात्याकडून त्यावर रासायनिक लेपन करून तिचे संरक्षण करण्यात आले आहे. 
निरा नृसिंहपूर येथे श्री विष्णूचा नरसिंह अवतार झाला असून, भक्त प्रल्हादाचे हे जन्मस्थळ असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे हे मंदिर म्हणजे  भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. नृसिंहपूराच्या मंदिराच्या शेजारीच लक्ष्मीचेही मंदिर आहे. सध्या निरा नृसिंहपूर येथे मंदिराच्या जतन दुरूस्तीचे काम चालू आहे. या मूर्तीचा वज्रलेप करण्याचा विचार देवस्थान समिती करीत होती. मात्र, या मूर्तीवर वज्रलेप न करता रासायनिक संरक्षण करता येईल अशी भूमिका राज्य शासनाच्या पुरातत्व खात्याने मांडली. त्याला देवस्थान समितीने होकार दिला. नृसिंह मूर्तीचे वज्रलेप काढून त्यावर रासायनिक लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला.  रासायनिक संरक्षणाचे काम करणारा गट तयार केला.  20 सप्टेंबरला मूर्तीच्या संरक्षणाचे हाती घेतलेले काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्य शासनाच्या पुरातत्व खात्याच्या पुणे विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 
 मूतीर्चे काम करताना यावर पहिला वज्रलेप हा 1881 मध्ये करण्यात आला होता हे लक्षात आले. २००९ पर्यंत जवळपास सात वेळा त्यावर वज्रलेप करण्यात आला. यामध्ये एम.सिल आणि ईपोक्सी सारख्या द्रवणांचा वापर करण्यात आला होता आणि 1881 पूर्वी वज्रलेपाच्या खाली चुना आणि वाळूचे मिश्रण करून मूर्तीवर लेपन करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या दोनशे वर्षात मूळ मूर्ती कोणीही पाहिलेली नव्हती. ही मूर्ती वालुकामय पाषाणाची आहे असा आजवर लोकांचा समज होता. त्यामुळेच मूतीर्चा काळ ठरवता येत नव्हता. मूर्तीचे  सर्व लेपन काढून टाकल्याने मूळ मूर्ती ही काळ्या पाषाणाची ( बेसाल्ट) असून, वाकाटक व त्या समकालीन मूतीर्शी साम्य दर्शविणारी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. या मूर्तीवरचे 15.480 किलोचे जुने वज्रलेप व कॉंक्रिटचे लेपन काढून रासायनिक लेपन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
मूर्तीच्या संरक्षणाचे काम करणा-या गटामध्ये विलास वाहणे,  सुधीर प्रधान कलासंवर्धक ( एमआरआयसी, लखनऊ),विनायक निठुरक ( सहाय्यक अभिरक्षक नागपूर संग्रहालय), वैभव मोरे, मारूती मोरे, प्रसाद पवार (नाशिक), निलेश बोहोटे, कपिल आदी लोकांचा समावेश होता. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 
पुरातत्व विभागाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांच्या मान्यतेनंतर काम हाती घेतले. आता पर्यंत वालुकामय पाषाणाची ही मूर्ती असल्याचा भ्रम दूर झाला आहे. मूळ मूर्तीचे स्वरुप प्रकाशात आले असून,  ती  १४०० वर्ष जुनी असावी असा प्राथमिक अंदाज आहे. लवकरच संशोधन करुन संपूर्ण अहवाल प्रकाशित करणार आहे. मूर्तीवर करण्यात आलेल्या रासायनिक संरक्षणामुळे पुढील वीस वर्ष ती टिकणार आहे. यासाठी आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना देवस्थान व पुजारी वर्गास देण्यात आल्या आहेत- विलास वाहणे , सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग म. शा. पुणे

Web Title: Chemical imitation on nira narshingpur murti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.