ोढा बुजल्याने कुरंकुभ एमआयडीचे रसायनिक पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:11 AM2021-05-07T04:11:01+5:302021-05-07T04:11:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रातील रसायनिक प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले घातक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रातील रसायनिक प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले घातक रसायनिक सांडपाणी पुणे- सोलापूर महामार्गावरील सेवारस्त्यावर आले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शेकडो नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सेवारस्त्यावर हे पाणी साचले असून, हळूहळू ते गावात पसरत आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कुरकुंभ आैद्योगिक वसाहतीच्या चुकीच्या कारभाराचा त्रास येथील सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. एमआयडीसीचे रसायनिक पाणी शेतात येत असल्याने ते थांबवण्यासाठी कुरकुंभ येथे पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी केंद्राच्या (सीईटीपी) परिसरात असणाऱ्या ओढ्याला मुरुमाच्या साह्याने बंद केले. त्यामुळे एरवी शेतीमार्गे ओढ्याच्या माध्यमातून कुरकुंभ येथील मुख्य चौकात येणारे रसायनिक सांडपाणी सध्या सेवारस्त्यावर साचले आहे. सेवारस्त्याला लागून असणाऱ्या गटारी मार्गाने हळूहळू उताराने कुरकुंभ गावात पसरत आहे.
दरम्यान, याबाबत अनेक तक्रारी ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी, खासदार, आमदार व इतर स्थानिक नेत्यांच्या बैठकीत रसायनिक सांडपाणी सोडत नसल्याचा अविर्भाव आणणाऱ्या उद्योजकांची पोलखोल झाली आहे. शंभरपेक्षा जास्त रसायनिक प्राकल्पातून प्रक्रिया न केलेले सांडपाणी सामूहिक प्रक्रिया केंद्रात सोडले जात आहे, तर अनेक उद्योजक सांडपाणी प्रक्रियावरील खर्च वाचवण्यासाठी रात्री-अपरात्री उघड्यावर पाणी सोडत असल्याचे अनेकवेळा पुराव्यानिशी सिद्ध देखील झाले आहे.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अनेक छोट्या प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले रसायनिक सांडपाणी सोडत असल्याचे आजवर सिद्ध झाले आहे. मात्र, आर्थिक संबंधाच्या अतूट बंधनामुळे प्रदूषण मंडळ यावर मूग गिळून गप्प बसण्याच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच दिसून येतो. या बाबत तक्रारी करूनही कुठलीच कारवाई झालेली नाही. याचा त्रास मात्र ग्रामस्थांना होत आहे. सामूहिक सांडपाणी केंद्राकडून फक्त वारंवार सेवा रस्त्यावरील पाणी उचलले जात आहे. मात्र, या प्रकाराला जे उद्योग जबाबदार आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.
चौकट
प्रदूषण आणि कोरोनाचे दुहेरी संकट
कुरकुंभ ग्रामस्थ सध्या प्रदूषण व कोरोना या दुहेरी जीवघेण्या संकटात सापडलेले आहे. सामूहिक सांडपाणी केंद्राच्या व प्रदूषण मंडळाच्या चुकीच्या कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तर प्रदूषण मंडळाने याकडे जास्त दुर्लक्ष केले आहे.
- राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ
फोटो ओळ : कुरकुंभ येथील सामूहिक सांडपाणी केंद्रातून बाहेर आलेले रसायनिक सांडपाणी.