कारखानदारांचे रासायनिक पाणी गटारांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:55 AM2018-06-19T02:55:24+5:302018-06-19T02:55:24+5:30
पावसाळा सुरू होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. मात्र महाड औद्योगिक वसाहतीमधील उघडे प्लॉट आणि गटारे रंगीबेरंगी झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.
- सिकंदर अनवारे
दासगाव : पावसाळा सुरू होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. मात्र महाड औद्योगिक वसाहतीमधील उघडे प्लॉट आणि गटारे रंगीबेरंगी झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. नालेसफाई न झाल्याने आता गटारांतील रसायनमिश्रित सांडपाणी रस्त्यावरच येवू लागले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळा सुरू झाला की महाड एमआयडीसी परिसरातील अनेक कारखान्यांमधून घातक रासायनिक सांडपाणी गटारांमध्ये, नाल्यांमध्ये सोडण्यात येते. यंदा देखील अशीच परिस्थिती या महाड औद्योगिक वसाहत औद्योगिक वसाहतीची झाली आहे. सुरुवातीच्या थोड्या लागणाऱ्या पावसामध्ये संपूर्ण महाड औद्योगिक वसाहत क्षेत्र रंगीबेरंगी झाली आहे. दरवर्षी मात्र गटारांमध्ये सोडण्यात येणारे पाणी सरळ सरळ वाहत थेट नदीला मिसळते. यंदा मात्र महाराष्टÑ औद्योगिक वसाहत महामंडळाकडून अद्याप या परिसरातील गटारांची साफसफाई न झाल्यामुळे हे सोडण्यात येणारे गटारातील रासायनिक सांडपाणी गटारांमध्येच तुंबून राहिले आहे, तर मोठ्या पावसात हे सांडपाणी रस्त्यावरच येत आहे. काही उघड्या प्लॉटमध्येही साचल्याचे दिसून येत आहे. सध्या रस्त्यावर येणाºया तसेच गटारांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे औद्योगिक परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. तर या गटारांमध्ये तुंबलेले घातक रसायन पाण्यामुळे परिसरातून नागरिक तसेच कामगारवर्गाला याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत असून आरोग्यास धोकादायक बनला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने बंद अवस्थेत आहे. कारखान्यांमध्ये पडलेले किंवा जुना स्टॉक असलेली पावडर किंवा रसायन पावसाच्या पाण्याबरोबरच वाहून येते. तर अनेकदा छोट्या कारखान्यांतून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येते.
महाड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या मागच्या बाजूस असलेल्या उघड्या जागेमध्ये पावसापूर्वीच केमिकल पाणी दिसत होते. पावसामुळे या प्लॉटला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून संपूर्ण प्लॉट पांढºया रंगाच्या रासायनिक पाण्याने भरला आहे. त्याचबरोबर सानिक, शेट्ये, मल्लक, निंबुस, सुदर्शन अशा इतर अनेक कारखान्यांसमोर गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक पाणी तुंबले आहे. सुदर्शन कारखान्यासमोरील गटारामध्ये गेली दोन महिन्यापासूनच सांडपाणी साचले आहे.
हेच रासायनिक पाणी पुढे सावित्री नदीत मिसळते. त्यामुळे नदीलगतच्या गावांना दूषित पाणी मिळत आहे. औद्योगिक वसाहतीतील झालेल्या या अवस्थेबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळ असो किंवा महाराष्टÑ औद्योगिक वसाहत महामंडळ असो याबद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच औद्योगिक वसाहत क्षेत्राच्या गटारांची साफसफाई महाराष्टÑ औद्योगिक महामंडळाकडून होणे गरजेची होती. मात्र त्यांचेकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वीचे काढायचे टेंडर ऐन पावसाळ्यात काढण्यात आल्याची माहिती महाराष्टÑ औद्योगिक महामंडळाच्या सूत्राकडून देण्यात आली आहे.
>बदल्यांचा फटका
महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बहुतेक अधिकाºयांच्या बदल्या झाल्या झाल्या आहेत. नवीन येणारे अधिकारी यांना मात्र या परिसराची माहिती कमी असते. सध्या नवीन आलेल्या अधिकाºयांचा गैरफायदा घेत महाड औद्योगिक क्षेत्रात हा उद्योग पाणी सोडण्याचा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी येणाºया अधिकाºयांनी लवकरच या परिसराची पाहणी करून या कारखानदारांना लगाम लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.